spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मृतदेहाच्या प्रवासातच मृत्यू! अज्ञात वाहनाच्या धडकेत एम्बुलन्स दरीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

 

नागपूर २५ – जबलपूर महामार्गावर एका अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेत, पुणे येथून कोलकात्याला वडिलांच्या मृतदेहासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातच मृत्यूचं दुसरं संकट कोसळलं. पुण्यात राहणाऱ्या कन्हाई बिस्वास यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा अबीर बिस्वास आपल्या वडिलांचा मृतदेह एम्बुलन्समधून कोलकात्याला घेऊन चालला होता. या प्रवासात त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक पंकज बिस्वासही होता. एम्बुलन्स चालवत होता चालक शिवाजी खल्लू भांबुरे. मात्र, नागपूर शहराच्या हद्दीत येताच, हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत पेट्रोल पंपाजवळ अचानक एम्बुलन्समध्ये बिघाड झाला. अबीर बिस्वास रस्ता ओलांडून मेकॅनिक शोधायला गेला असताना, मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने उभी असलेल्या एम्बुलन्सला जबरदस्त धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, एम्बुलन्स थेट २५ फूट खोल दरीत जाऊन पडली.

या अपघातात एम्बुलन्समध्ये बसलेले पंकज बिस्वास आणि चालक शिवाजी भांबुरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नागपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांनी प्राण सोडले. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एकाच कुटुंबावर दुहेरी आघात झाल्याने कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. मृतदेह घेऊन निघालेल्या प्रवासातच अशा स्वरूपाची दुसरी दुर्दैवी घटना घडणे हे अत्यंत विचलित करणारे आहे. हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण, तसेच दोषी वाहन व चालक कोण, याचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Popular Articles