Home Latest News नागपूरच्या क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्‍थान – आरएआरआय मध्‍ये 10 वा आयुर्वेद दिन‍...

नागपूरच्या क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्‍थान – आरएआरआय मध्‍ये 10 वा आयुर्वेद दिन‍ विविध उपक्रमांनी साजरा

0
63

– आज सप्टेंबर रोजी समारोप आणि पुरस्‍कार वितरण

नागपूर :- केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या अधीन क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, नंदनवन, नागपूर येथे 10 व्‍या आयुर्वेद दिवसानिमित्‍त विविध उपक्रम राबवण्‍यात आले. यंदाच्‍या आयुर्वेद दिवसाची मध्‍यवर्ती संकल्‍पना “जनसामान्‍यासाठी आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी आयुर्वेद” ही आहे. त्‍याअनुषंगाने 10 सप्‍टेंबरपासून विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्‍यात आलेल्‍या आयुर्वेद दिवसाचा समारोप मंगळवार, 23 सप्‍टेंबर रोजी होत आहे, अशी माहिती क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानचे प्रभारी सहायक संचालक (आयुर्वेद) डॉ. एम. एन. सुर्यवंशी यांनी नागपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आयुर्वेद दिवसाचे उद्दिष्ट आयुर्वेदाला जागतिक आरोग्य क्षेत्रात अग्रभागी स्थान देणे, राष्ट्रीय आरोग्य धोरणात योगदान करणे, रोगभार व मृत्यूदर कमी करणे तसेच मनुष्य, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणासाठी समग्र आरोग्य दृष्टिकोन प्रस्थापित करणे आहे, हे असल्‍याचे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले.

आयुर्वेद दिवसानिमित्त 10 सप्टेंबरपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. आयुर्वेद दिनाचा उद्घाटन सोहळा 10 तारखेला पार पडला. त्‍यानंतर रांगोळी स्पर्धा, ओपीडीमध्ये रुग्णांसाठी जागरूकता व्याख्याने, I Like Ayurveda डिजिटल मोहिम, वृक्षारोपण अभियान, नॉन-फायर आयुर्वेद व्यंजन स्पर्धा, औषधी वनस्पतींचे वितरण, शालेय वैद्यकीय शिबिर, वेबिनार, प्रश्नोत्तरी आणि वॉकेथॉन अशा विविध कार्यक्रम घेण्‍यात आले.

लठ्ठपणावरील आयुर्वेदीय आहार, आयुर्वेदाचे डिजिटल रूपांतर, भ्रामक जाहिरातींचा प्रतिकार, कर्करोग प्रतिबंधात आयुर्वेदाची भूमिका, विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेद जागरूकता, पशू व वनस्पती आरोग्य, तसेच माध्यमांच्या सहभागाद्वारे जागतिक आरोग्य संवर्धन, असे अनेक विषय या आयुर्वेद दिनाच्‍या निमित्‍ताने हाताळले गेले असल्‍याचे डॉ. सुर्यवंशी म्‍हणाले.

समारोपीय कार्यक्रमात विविध स्‍पर्धांतील विजेत्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुरस्‍कृत केले जाणार आहे.