नागपूर :- नागपूर महानगरपालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महानगरपालिका अधिनियमातील कलम १४०-अ व १४०-ब अंतर्गत ठराव क्रमांक २० नुसार हा निर्णय घेण्यात आला असून, कर वेळेत भरल्यास मालमत्ताधारकांना लक्षणीय सवलत मिळणार आहे.
महापौर निता ठाकरे, उपपहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेते नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती सरिता कावरे, प्र. अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्या देखरेखीत नागरिकांसाठी सवलत दिली जात आहे. त्यानुसार, येत्या ३१ जुलै २०२६ पर्यंत चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर घरी बसून ऑनलाईन पद्धतीने मनपा निधीत भरल्यास करदात्यांना एकूण १५ टक्के सवलत मिळणार आहे. तर मालमत्ता कर विभागाच्या वसुली केंद्रावर जाऊन आगाऊ कर भरणाऱ्यांसाठी १० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही सवलत शासन कर वगळून लागू राहणार आहे. तसेच ३१ जुलैनंतर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत मालमत्ता कर मालमत्ता कर घरी बसून ऑनलाईन पद्धतीने मनपा निधीत भरल्यास १० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे, तर मालमत्ता कर विभागाच्या वसुली केंद्रावर जाऊन आगाऊ मालमत्ता कर भरणा केल्यास ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
नागरिकांना या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले आहे. या निर्णयामुळे नागरिकांना वेळेत कर भरण्यास प्रोत्साहन मिळण्याबरोबरच महानगरपालिकेच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.