– 450 जागांसाठी भरती ; सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी
यवतमाळ :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्याधारित मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अथवा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन दि. 20 मे 2026 रोजी करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा उद्योग भवन, 4 था माळा, दारव्हा रोड, यवतमाळ येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आयोजित करण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्यांमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात क्वेश कॉर्प प्रा. लि. मार्फत ट्रेनी ऑपरेटर पदासाठी तब्बल 425 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवारांनी किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक कडून ट्रेनी क्रेडिट ऑफिसरच्या 25 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या पदासाठी 12 वी किंवा पदवीधर उमेदवार पात्र असून वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, रिझ्युम किंवा बायोडाटा ही कागदपत्रे सोबत आणावीत.
या रोजगार मेळाव्याद्वारे युवकांना थेट मुलाखतीद्वारे रोजगार मिळविण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त प. भ. यांनी केले आहे.