– जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाद्वारे आयोजन
यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ” या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीर 30 एप्रिल रोजी उत्साहात पार पडले.
सर्वोच्च न्यायालयातील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालयातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशावरुन आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर सी. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव दिपक एच. दाभाडे यांच्या समन्वयाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा तगडपल्लेवार तर वैद्यकीय अधिक्षक डॉ. रविंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्त्या म्हणून पॅनल वकील विजया घाडगे व सहायक लोकअभिरक्षक तृप्ती आसवा उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या पॅनल वकील विजया घाडगे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या भारत सरकारच्या “कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध आणि निवारण अधिनियम, 2013 या कायद्याविषयी माहिती दिली. तसेच महिलांसाठीच्या कायद्यातील तरतूदी, नियम आणि हक्कांची माहिती दिली. हा कायदा सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी, कंपनी, संस्था, शाळा, कॉलेज, कारखाने, दुकान, घर या ठिकाणी लागू असून प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सहायक लोकअभिरक्षक तृप्ती आसवा यांनी सर्वांनी टिम म्हणून काम करावे. विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच कुठलाही कायदेशिर सल्ला किंवा मदतीची आवश्यकता वाटल्यास जिल्हा विधी सेवा प्रधिकरण, यवतमाळ येथे संपर्क साधावा असे आवाहन केले.
या कार्यकमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा महिला व बाल रूग्णालयाच्या डॉ. धनश्री गणोकर यांनी केले. सदर कार्यक्रमात महिला डॉक्टर, नर्स, कर्मचारी उपस्थित होते.