spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात १७ वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने हत्या; वाढत्या गुन्हेगारीने शहर हादरले

हंसराज, भंडारा :- शांत आणि संयमी अशी ओळख असलेल्या भंडारा शहराच्या सुरक्षिततेला आज गालबोट लागले आहे. शहराच्या मेंढा परिसरात राहणारा आणि भागीरथ शाळेत शिकणारा १७ वर्षीय विद्यार्थी, अंशू गजानन येरकडे याची दिवसा धारदार चाकूने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण असून, एका अल्पवयीन मुलानेच हे टोकाचे पाऊल उचलल्याने ‘भीषण वास्तव’ समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंशू हा शाळेतून आपल्या घराकडे परतत असताना ही हृदयद्रावक घटना घडली. जुन्या वादातून किंवा अन्य कोणत्या कारणातून तीन मुलांनी त्याला वाटेत गाठले. त्यापैकी एका १६ वर्षीय मुलाने रागाच्या भरात अंशूवर धारदार चाकूने ‘जिवघेणे’ वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंशूला तातडीने मदत मिळण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायद्याच्या धाकावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

समता नगर आणि चाचा नेहरू गार्डन बनले गुन्हेगारीचे केंद्र या हत्येच्या मुळाशी शहरातील वाढती व्यसनाधीनता असल्याचे स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे. मेंढा, समता नगर (फेज २) आणि चाचा नेहरू गार्डन परिसर सध्या गांजा आणि ‘एमडी’ (MD) सारख्या अत्यंत घातक अमली पदार्थांच्या विक्रीचे मुख्य अड्डे बनले आहेत.”शालेय वयाची मुले नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत, आमची मुले बाहेर पाठवताना आता भीती वाटते,” असा आक्रोश परिसरातील पालकांनी व्यक्त केला आहे.

प्रशासन कधी जागे होणार? भंडाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी विघ्नहर्ता हॉटेल परिसरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला (हाफ मर्डर) झाला होता. त्या नंतर ऑगस्ट महिन्यात आंबेडकर वॉर्डात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न झाला होता. आणि आता ही विद्यार्थ्याची हत्या. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे “आपला भंडारा आता सुरक्षित राहिला नाही,” अशी संतप्त भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

नगरसेवकाचा घणाघात: “पोलिसांची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात” या संदर्भात मेंढा परिसराचे नगरसेवक गजानन बादशाह यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “मेंढा परिसरात गांजा आणि ड्रग्जचा व्यापार राजरोसपणे सुरू आहे. आम्ही वारंवार पोलिसांना याबद्दल माहिती दिली, परंतु ठोस कारवाई झाली नाही. पोलिसांची गाडी जेव्हा परिसरात येते, तेव्हा तिचा सायरन/हॉर्न लांबूनच ऐकू येतो, ज्यामुळे नशा करणारे आणि विक्रेते सावध होऊन पसार होतात. ही केवळ नावाला केलेली गस्त थांबवून पोलिसांनी आता कडक पावले उचलण्याची गरज आहे.”

– गजानन बादशाह नगरसेवक

Popular Articles