spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये ४०० प्रकरणे तडजोडीने निकाली, दीड कोटींहून अधिकची वसुली

गडचिरोली :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे आदेश व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये वर्षातील चौथी व शेवटची राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी यशस्वीपणे पार पडली.

या लोकअदालतीमध्ये तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे, धनादेश नापसंतीबाबत एन.आय. अॅक्ट अंतर्गत कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे तसेच दाखलपूर्व वादांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत वीजबिल प्रकरणे, पतसंस्था व बँकांची थकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपन्यांची कर्ज वसूली प्रकरणे, ग्राहक न्यायालयातील दावे तसेच मोटार वाहन कायद्यान्वये चालान प्रकरणे लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती.

संपूर्ण जिल्ह्यात एकूण १० पॅनल स्थापन करण्यात आले होते. या पॅनलसमोर एकूण ३३२ प्रलंबित खटले व ६८ दाखलपूर्व वाद प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण १ कोटी ५९ लाख ६६ हजार ५०७ रुपये इतकी रक्कम वसूल झाली. निकाली निघालेल्या एकूण प्रकरणांपैकी २७० प्रकरणे गुन्हा कबुलीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आली.

जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील पॅनल क्रमांक २ समोर आपसी समझोत्यासाठी आलेल्या एका वैवाहिक वादाच्या प्रकरणात पती-पत्नी यांच्यात समझोता होऊन पत्नी पुन्हा संसारासाठी नांदायला गेल्याने विनायक रा. जोशी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांनी उभयतांचा सत्कार करून लोकअदालतीच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकला.

संपूर्ण लोकअदालतीचे आयोजन विनायक रा. जोशी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली आणि अंकुश पुंडलिकराव खानोरकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.

जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे पॅनल क्रमांक १ वर व्ही. एस. खोत, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली, पॅनल क्रमांक २ वर एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, गडचिरोली आणि पॅनल क्रमांक ३ वर एस. बी. विजयकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली यांनी कामकाज पाहिले. गुन्हा कबुलीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय कार्यरत ठेवण्यात आले होते. या विशेष न्यायालयात एस. ए. भैसारे, सहदिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, कनिष्ठ स्तर, चामोर्शी यांनी काम पाहिले.

पॅनल क्रमांक १ मध्ये रिंकी मनोहर भगत, विधी स्वयंसेविका, पॅनल क्रमांक २ मध्ये नरेंद्र ढिवरू मोटघरे, विधी स्वयंसेवक तसेच पॅनल क्रमांक ३ मध्ये प्रवीण श्रीराम घाटे, विधी स्वयंसेवक यांनी पॅनल सदस्य म्हणून योगदान दिले.

सदर राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर आखाडे, जेष्ठ अधिवक्ता वृंद, समस्त अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.