spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलिसांशी झटापट करून ५०-६० जुगारी पळाले, केळवद पोलीस आरोपींना पकडण्यात अपयशी

सावनेर, ८ : सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत २२ ऑगस्ट रोजी बैल पोळ्याच्या दिवशी केळवद गावातील बाजार परिसर, प्रभाग क्रमांक १ मधील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी सुमारे ५०-६० जुगारांनी वाद घालून पळ काढला. या घटनेनंतर केळवद पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

सूत्रांनुसार, हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी नितेश गोपाल पुसाम यांच्या तक्रारीवरून अज्ञात जुगारांविरोधात भादंवि कलम १३२, १२१ (१), १८९ (२) आणि भारतीय न्याय संहिता ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार अनिल राऊत करत आहेत.

दोन आठवडे उलटूनही आरोपी फरार

घटनेला दोन आठवडे उलटले तरी अद्याप फरार आरोपींना  अटक करण्यात आलेली नाही. ज्या घरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला, त्या घरमालकासह पळून गेलेल्या ५०-६० जुगारांचे फुटेज पोलिसांकडे उपलब्ध असूनही ही कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जुगार अड्डा चालवणारा आणि इतर जुगारी स्थानिक राजकारण्यांच्या जवळचे असल्याने पोलीस त्यांना अटक करण्याची हिंमत दाखवत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल झाल्याची चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जुगाराने मोठी रक्कम हरल्यामुळे त्याने पैसे परत मागितले. ते देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने जुगार अड्ड्याचा व्हिडिओ काढून पोलिसांना पाठवला, ज्यामुळे हा छापा टाकला गेला. पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचताच गोंधळ उडाला. बाहेरून एका पोलीस कर्मचाऱ्याने गेट बंद करण्याचा प्रयत्न केला, पण ५०-६० लोकांच्या जमावाला तो एकटा रोखू शकला नाही. यावेळी आरोपींनी पोलिसांशी धक्काबुक्की आणि मारामारी केल्याचीही चर्चा आहे. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने सुरुवातीला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शेवटी गुन्हा दाखल करावाच लागला. आता या प्रकरणाला राजकीय वळण देऊन गुन्हा दाबण्याचा प्रयत्न नागपूरमधील उच्च श्रेणीचे अधिकारी करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.