“अधिकारी कार्यरत, मग चौकशी कशी निष्पक्ष?” निष्पक्ष चौकशी की दिखावा? – जनतेचा आक्रोश

0
56

 

सावनेर ८ : सावनेर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची अखेर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी अचानक कार्यालयाला भेट देऊन संबंधित महिला दुय्यम निबंधकाविरुद्ध चौकशीचे आदेश दिले.

महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे मंगळवारी कार्यालयात आले आणि तक्रारदारांचे जबाब नोंदवले. यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक साहेबराव दुनोडे आणि मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे देखील उपस्थित होते. नागरिकांनी कार्यालयातील कामकाजातील अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत अनेक लेखी व तोंडी तक्रारी नोंदवल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले आहे ही बाब स्वागतार्हच म्हणावी लागेल. पण प्रश्न असा आहे की, ही चौकशी खरी निष्पक्ष होणार आहे का?

कारण नागरिकांच्या तक्रारी गंभीर आहेत – कामात पारदर्शकतेचा अभाव, सेवा पुरवण्यात होणारा विलंब, कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन आणि नागरिकांना वणवण लावण्याची पद्धत. नोंदणी महानिरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेकांनी लेखी व तोंडी तक्रारी मांडल्या. आश्वासनेही देण्यात आली. पण केवळ आश्वासनांनी जनता समाधानी होणार नाही.

आजही संबंधित अधिकारी त्याच पदावर कार्यरत आहेत. मग अशा परिस्थितीत चौकशी निष्पक्ष कशी होणार? चौकशीदरम्यानही जर तीच अधिकारी खुर्चीत बसून राहिला, तर त्याच्याविरोधातील पुरावे किंवा तक्रारी कितपत मोकळेपणाने मांडल्या जातील, याविषयी शंका उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळेच नागरिकांच्या मनात चर्चा रंगते आहे  “ही चौकशी खरी की फक्त देखावा?”

प्रशासनावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस ढासळत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिकता या भोंगळ कारभारामुळे अक्षरशः उद्‌ध्वस्त होत आहे. भ्रष्टाचार, वायफळ विलंब आणि अपमानास्पद वागणूक या तक्रारी नित्याच्या झाल्या आहेत.

सरकारकडून जर खरोखरच सुधारणा अपेक्षित असेल, तर चौकशी केवळ फाईलीत मर्यादित न राहता प्रत्यक्ष कारवाईत उतरली पाहिजे. अन्यथा जनतेचा रोष आणखी तीव्र होणार आहे.

जनतेची मागणी एकच आहे – निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई. अन्यथा ही चौकशी ही केवळ नौटंकी ठरून नागरिकांचा विश्वास आणखी डळमळीत होईल.