– तीनदा निवेदन देऊनही प्रश्न कायम; गोन्हा शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
कुही :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोन्हा येथे ७८ विद्यार्थी शिक्षण घेत असताना गणित व विज्ञान विषयांसाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिक्षक नियुक्तीच्या मागणीसाठी तीनदा निवेदने देऊनही प्रश्न सुटला नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ५२, तर सहावी व सातवीमध्ये २६ विद्यार्थी आहेत. गणित आणि विज्ञान हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीतील महत्त्वाचे विषय असतानाही शिक्षकांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, शिक्षक नियुक्तीसाठी गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तीन वेळा निवेदने देण्यात आली. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कमी पटसंख्या असलेल्या काही शाळांमध्ये विषय शिक्षक उपलब्ध असताना ७८ विद्यार्थी असलेल्या गोन्हा शाळेकडे दुर्लक्ष का, असा सवालही उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल उपस्थित करत गोन्हा शाळेत गणित व विज्ञान विषयांचे शिक्षक तातडीने नियुक्त करण्याची मागणी शाळा समितीने केली आहे.








