spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

७ ऑगस्ट – शाश्वत शेती दिन हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना आदरांजली

 

सावनेर ८ – महाराष्ट्र शासनाच्या २९ जुलै २०२५ रोजीच्या निर्णयानुसार, महान कृषी व वनस्पती शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. एम. एस.  स्वामीनाथन   यांचा जन्मदिवस अर्थात ७ ऑगस्ट हा दिवस राज्यात दरवर्षी “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. काल (७ ऑगस्ट) हा दिन राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

शाश्वत शेती म्हणजे पर्यावरणावर कमी दुष्परिणाम करणारी, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणारी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अन्न व संसाधने उपलब्ध राहतील याची दक्षता घेणारी शेती. ही शेती सध्याच्या पिढीच्या गरजाही भागवते आणि भविष्यासाठी अन्नसुरक्षेची खात्री देते.

डॉ.  स्वामीनाथन   यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडूतील कुंभकोणम् येथे झाला. बालपणात त्यांनी दुष्काळाचे चटके अनुभवले आणि त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाऐवजी कृषीशास्त्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी देश-विदेशातील नामांकित संस्थांमध्ये काम करत उच्च उत्पादनक्षम गहू, तांदूळ आणि अन्य वाण विकसित केले. यामुळे देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आणि आर्थिक स्थैर्य मिळाले.

“प्रयोगशाळेतील संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे” ही त्यांची ठाम भूमिका होती – आणि आजही ती तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या औचित्याने “डॉ. एम. एस.  स्वामीनाथन  जैव-आनंद केंद्र” राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या केंद्रांच्या माध्यमातून शाश्वत शेती, हवामान अनुकूल शेती, महिला शेतकरी सक्षमीकरण, पर्यावरणपूरक शेती पद्धती आणि अन्नसुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये नवकल्पनांचा प्रचार-प्रसार केला जाणार आहे.

एम. एस.  स्वामीनाथन   रिसर्च फाउंडेशन हेही संस्था आजही आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रात १ जुलैला राज्य कृषी दिन, २३ डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिवस, आणि आता ७ ऑगस्ट शाश्वत शेती दिन – हे कृषी केंद्रित दिवस साजरे होणे आश्वासक आहे; मात्र, या सर्व उपक्रमांमधून शेतकरी “दीन” न राहता “दीनदयाळ” व्हावा, एवढीच खरी अपेक्षा आहे.

आजच्या दिवशी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल – डॉ.  स्वामीनाथन  यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या (२००४) अध्यक्षपदावर असताना कृषी विकासासाठी अनेक शिफारशी केल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे, पिकांना किमान आधारभूत किंमत ही उत्पादन खर्चाच्या किमान ५०% अधिक असावी. आजही देशातील शेतकरी या शिफारशीच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ज्या दिवशी ही शिफारस पूर्णपणे लागू होईल, तोच खरा “शाश्वत शेती दिन” असेल, आणि तीच डॉ.  स्वामीनाथन   यांना शासन व समाजाकडून मिळणारी खरी श्रद्धांजली ठरेल. – प्रा. विलास डोईफोडे, सावनेर, जि. नागपूर

Popular Articles