मुंबई २९ : मुख्यमंत्र्यांनी ठोस प्रपोजलसह जरांगे पाटलांशी चर्चा करायला हवी होती. जर आपण ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ स्थापन करत निधी उपलब्ध केला यासह प्रशासनातील 5 वरीष्ठ अधिकारी तुम्ही कामाला लावले, आणि मराठा समाज रस्त्यावर आहे, ही एक दरी मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे.यामुळेच लोक देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिडले आहेत, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, त्यांच्यावर जे जातीय द्वेष निर्माण केल्याचे आरोप केले जात आहेत त्यासाठी ते स्वत: जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक समाज माझा आहे आणि मी त्यांचा नेता आहे ही यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी जी दिशा दिली त्यापासून ते भरकटले आहे. फडणवीस एक जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहे. मला नेता समजावा म्हणून इतर जातींमध्ये भांडण लावण्याचे काम फडणवीसांकडून सुरू आहे.
कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम गृहखात्याचे
संजय राऊत म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची राजधानी आहे. राज्यभरातून मराठी माणूस आपल्या मागण्यांसाठी मुंबईत आला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे न्यायालयाचे काम नाही. हे सरकारचे आणि गृह खात्याचे काम आहे आणि खास म्हणजे मुख्यमंत्र्यांचे काम आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजकारण करणाऱ्यांचे नाव सांगावे
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की कुणीतरी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. एक समाज आपल्या मागण्या घेऊन मुंबईत आला आहे, यात त्यांना काय राजकारण दिसत आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. आपण सत्तेत आला तेव्हापासून जातीय प्रश्नांवर राजकारण करत आला आहात. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, जनतेला विश्वासात घेऊन सांगा जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवत राजकारण करणारे तुम्हाला कोण वाटत आहेत. तुमच्या सरकारमध्ये आहेत, विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेट मध्ये आहेत.
मराठी माणसाची ताकद समजावी
संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये मराठा समाजाचे लाखो लोक आले आहेत. मुंबईत सर्वांत मोठा सार्वजनिक गणेशोत्सव असतो. आमचे बांधव या गोष्टीला डिस्टर्ब न करता आंदोलन करतील. मनोज जरांगे पाटील हे दबावाखाली येणारा माणूस नाही.सरकारने त्यांच्याशी चर्चा करत मार्ग काढला पाहिजे. त्यांच्या मागण्यांवर सरकारने तोडगा काढला पाहिजे.मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे आम्ही स्वागत करत आहोत. ही मराठी माणसाची ताकद आहे हे मराठी द्रोही लोकांना कळू द्यात.
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार जनतेला माहिती
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरवाली सराटी मध्ये जाऊन जर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईमध्ये आले नसते,चर्चेची दारं उघडी राहिली असती.नरेंद्र मोदी जसे जाती जातींमध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे तसे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचे काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. जो तो आपल्या जातीचे राजकारण करत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री त्यामध्ये पुढे असतील. पण मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता आहे. जनता त्यांच्याकडे आशेने बघत असते.




