Home Latest News जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मनपा संजयनगर शाळेचा संघ विजयी

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मनपा संजयनगर शाळेचा संघ विजयी

0
72

नागपूर, ता. २९: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या वतीने शुक्रवारी (ता.29) हॉकीचे जादूगार खेलरत्न पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुलांची खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेच्या संजयनगर  शाळेने विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात संजयनगर शाळेने आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूलचा १०-८ अशा गुणांनी पराभव केला.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी,अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त  राजेश भगत, शिक्षणाधिकारी  साधना सयाम, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियूष आंबुलकर, जिल्हा खो-खो संघटनेचे सहसचिव डॉ. पद्माकर चारमोडे आणि माजी आंतरराष्ट्रीय खो-खोपटू  अश्फाक शेख यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन सर्व खेळाडूंचे मनोबल वाढवले. स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या क्रीडा कार्यकारी अधिकारी  दिपाली साबणे, महिला महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पराग बनसोले, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या  सोनाली मोकासे या प्रामुख्याने उपस्थिती होती.  या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला गौरवण्यात आले.

विजेता संघ संजयनगर मनपा शाळेचे अभिनंदन करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका  गीता दांडेकर, प्रशिक्षक  वैभव कुंभारे, आणि व्यवस्थापक अशोक चौधरी यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण स्पर्धेत संजयनगर मनपा शाळेने उत्कृष्ट कामगिरी केली. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी शाहू गार्डन स्कूलचा १०-३ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. त्याआधी, उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी प्रेरणा कॉन्व्हेंट संघावर २ मिनिटे वेळ शिल्लक असताना ४-२ अशा गुणांनी विजय मिळवला, जो त्यांच्या जबरदस्त खेळाचा पुरावा ठरला. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले.