अधिकाधिक पुरस्कार मिळवून जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे आवाहन
गडचिरोली ४ : गडचिरोली जिल्ह्याने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत अधिकाधिक पुरस्कार मिळवून जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले. येथील संस्कृति सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सर्व पंचायतींनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) पंकज भोयर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुयंवशी, प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पुरस्कारांची माहिती:
या अभियानांतर्गत चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना मोठ्या रकमेचे पुरस्कार दिले जाणार आहेत.
ग्रामपंचायतीसाठी:
- तालुका स्तर: प्रथम क्रमांक – 15 लाख रुपये, द्वितीय – 12 लाख, तृतीय – 8 लाख. दोन विशेष ग्रामपंचायतींना प्रत्येकी 5 लाख रुपये.
- जिल्हा स्तर: प्रथम – 50 लाख, द्वितीय – 30 लाख, तृतीय – 20 लाख रुपये.
- विभागीय स्तर: प्रथम – 1 कोटी, द्वितीय – 80 लाख, तृतीय – 60 लाख रुपये.
- राज्य स्तर: प्रथम – 5 कोटी, द्वितीय – 3 कोटी, तृतीय – 2 कोटी रुपये.
पंचायत समितीसाठी:
- विभागीय स्तर: प्रथम – 1 कोटी, द्वितीय – 75 लाख, तृतीय – 60 लाख रुपये.
- राज्य स्तर: प्रथम – 2 कोटी, द्वितीय – 1.5 कोटी, तृतीय – 1.25 कोटी रुपये.
जिल्हा परिषदेसाठी:
- राज्य स्तर: प्रथम – 5 कोटी, द्वितीय – 3 कोटी, तृतीय – 2 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी.
या कार्यशाळेचे संचालन शेषराव नागमोती यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांनी प्रास्ताविक केले, तर अखिल श्रीरामवार यांनी आभार मानले. या वेळी सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सरपंच आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




