Home Latest News ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त खापा शहरात भव्य मिरवणूक, हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त खापा शहरात भव्य मिरवणूक, हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश

0
55

 

खापा, ८ : प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजेच ईद-ए-मिलादुन्नबी च्या दिवशी, ‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’ आणि ‘अल मदिना चल मदिना’च्या जयघोषाने खापा शहर दुमदुमून गेले. या निमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकता आणि शांततेचा संदेश दिला.

या मिरवणुकीसाठी खापा मस्जिदीला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. मुस्लिम बांधवांतर्फे काढलेल्या या जुलूसमध्ये मौलाना मकसूद आलम, गुलाम मुस्तफा, अर्सलान अन्सारी आणि त्यांच्या चमूसह अनेक नागरिकांनी भाग घेतला. मुला-मुलींनी नात-ए-शरीफ (पैगंबर मोहम्मद यांची स्तुती करणाऱ्या कविता) सादर केल्या. यावेळी इस्लाम धर्माच्या शिकवणींवर आधारित प्रवचने देऊन सामाजिक सलोखा वाढवण्यावर भर देण्यात आला.

विविध ठिकाणी स्वागत आणि सत्कार

जुलूस मार्गावर अनेक ठिकाणी स्वागतपर स्टॉल्स लावण्यात आले होते. युनुस कुरेशी, शब्बीर कुरेशी, सईद कुरेशी, रुमान शेख, भाजयुमोचे पियूष बुरडे, रफिक शेख आणि शम्मी शेख यांच्यासह अनेकांनी नाश्ता, पाणी, चिप्स आणि बिस्किटे वाटून मिरवणुकीतील लोकांचे स्वागत केले.

मिरवणुकीची सुरुवात मदारशाह बाबांच्या निंबाच्या झाडाखालून झाली आणि ती शहराच्या मुख्य मार्गावरून ऐतिहासिक हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद दर्ग्या येथे पोहोचली. तिथे फुल चादर अर्पण करून देशात सुख-शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यानंतर जुलूस पुन्हा मशीदीत परतल्यावर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

यानिमित्ताने खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे, पी.एस.आय. नासरे, मशीदीचे इमाम मकसूद आलम आणि शहरातील इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ठाणेदार किशोर भुजाडे यांनी ईद मिलाद आणि गणेश विसर्जन या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

या कार्यक्रमाला खापा मशीद कमिटीचे सदस्य तसेच मुस्लिम आणि हिंदू समाजाचे अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, ज्यांनी एकोप्याची भावना दर्शविली.