भंडारा ८ : शेतातून काम करून परतणाऱ्या महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या ई-रिक्षाला एका भरधाव वेगातील कारने धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह ९ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात साकोली शहरापासून काही अंतरावर महामार्गावर घडला.
मोहघाटा गावातील या महिला मजूर साकोली जवळील पोद्दार शाळेजवळच्या एका शेतात तण काढण्याचे काम करत होत्या. दिवसभराचे काम संपवून त्या ई-रिक्षाने गावाकडे परत निघाल्या होत्या. त्याचवेळी नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने त्यांच्या ई-रिक्षाला जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने साकोलीच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलवण्यात आले आहे.




