– उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत राऊत यांचे राहुल गांधींसोबत डील
– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची बोचरी टीका
मुंबई :- संजय राऊत यांनी स्व. आनंद दिघे यांच्यावर काढलेल्या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची उठाठेव करू नये संजय राऊत यांच्या आयुष्यावर जर चित्रपट काढायचा ठरवले, तर त्याचे समर्पक नाव ‘माझा भोंगा, माझी बांग’ असे ठेवावे लागेल. कारण राऊत रोज सकाळी उठून भोंगा वाजवणे आणि बांग देणे यापलीकडे दुसरे काम करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यावर उठसूठ टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे असा खोचक सल्ला भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी श्री. राऊत यांना दिला. उबाठा सेनेला काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत राऊत यांनी राहुल गांधींसोबत डील केले असल्याचा सणसणीत टोलाही बन यांनी लगावला.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपामध्ये विलीन होण्याचा हास्यास्पद आरोप करणाऱ्या राऊत यांना त्यांची जागा दाखवत बन म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर शिवसेना उद्धव गटाचे विसर्जन होईल आणि त्यांच्यासमोर काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही. राऊत हे राहुल गांधी यांची करत असलेली चमचेगीरी पाहता उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत राऊत यांनीच राहुल गांधींसोबत डील केले असणार. राऊत यांचे गुरू हे आता वंदनीय बाळासाहेब नाहीत तर राहुल गांधी झाल्याचे बन म्हणाले. राहुल गांधी दिल्लीमध्ये बसून नक्षली अजेंडा पुढे नेत आहेत आणि तोच अजेंडा राऊत महाराष्ट्रात रेटत आहेत. राहुल गांधी यांचे शिष्यत्व पत्करून श्री. राऊत हे महाराष्ट्रात अराजक निर्माण करण्याचे काम करत आहेत असा आरोपही त्यांनी केला. मात्र देशातील सूज्ञ जनतेने सलग तीन लोकसभा निवडणुकांमधून राहुल गांधी यांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे अध:पतन करण्याचे पाप राऊतांचे
महाराष्ट्राच्या आजवरच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीत चिखलफेक, अश्लील आणि कमरेखालच्या भाषेचा वापर सुरू करण्याचे पाप संजय राऊतांनी केले आहे. सकाळी उठून प्रत्येक नेत्याला शिवीगाळ करणे आणि माइकसमोर उभे राहून वाटेल ते बोलणे हा धंदा सुरू केल्याचा आरोप श्री. बन यांनी केला. यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांनी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपली मात्र राऊतांनी त्या परंपरेला घाणीत खेचले असेही त्यांनी नमूद केले.




