spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बॅंकांनी पिककर्ज वाटप वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे – जिल्हाधिकारी विकास मीना.

 

 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पिककर्ज वाटपाचा आढावा

98 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 18 कोटीचे वाटप

कमी पिककर्ज वाटप असणाऱ्या बॅंकांना पत्र

यवतमाळ, ०५  : प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. एकही शेतकरी यापासून वंचित राहू नये. त्यामुळे बॅंकांनी आपल्या कर्ज वाटपाची गती वाढवावी. ज्या बॅंकांचे वाटप कमी आहे, त्यांनी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या.

महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बॅंकांकडून पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे तसेच सर्व बॅंकांचे जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बॅंक निहाय पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला. काही बॅंका वाटपात मागे असल्याने त्यांना विशेष प्रयत्नाने कर्ज वाटप वाढविण्याच्या सूचना केल्या. शाखा स्तरावर बॅंकांनी प्रयत्न करावे. एकही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये. कर्ज वाटपाबाबत शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण केले जावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकरी किंवा विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते. ही रक्कम बॅंका परस्पर कपात करतात. ही रक्कम कपात न करता लाभार्थ्यांना परत देण्यात यावी. याबाबत शेतकरी, लाभार्थ्यांच्या तक्रारी येता कामा नये, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

एकमुस्त रक्कम भरणाऱ्यांना तातडीने कर्ज द्या

बरेच शेतकरी आपल्याकडील थकीत कर्जाची रक्कम एकमुस्त भरून कर्ज खाते निल करतात. अशा शेतकऱ्यांना काही बॅंका नव्याने पिककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येतात. ज्यांनी पुर्णपणे कर्जाचा भरणा केला आहे, अशा शेतकऱ्यांना तातडीने नव्याने पिककर्ज बॅंकांनी दिले पाहिजे.

98 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 18 कोटीचे वाटप

जिल्ह्यात आतापर्यंत सर्व बॅंकांनी मिळून एकून 98 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 18 कोटी रुपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे. सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकने 50 हजार शेतकऱ्यांना 447 कोटीचे वाटप केले आहे. त्यानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 12 हजार शेतकऱ्यांना 131 कोटी, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने 8 हजार 700 शेतकऱ्यांना 119 कोटी, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने 6 हजार 700 शेतकऱ्यांना 72 कोटीचे वाटप केले आहे. ज्या बॅंकांनी चांगले वाटप केले त्यांना अभिनंदनाचे तर ज्यांचे वाटप कमी आहे, त्याने गती वाढविण्याच्या सक्त सूचना देणारे पत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Popular Articles