Home Latest News कचऱ्याच्या योग्य वर्गीकरणासह वाहन चालविताना सतर्कता बाळगा

कचऱ्याच्या योग्य वर्गीकरणासह वाहन चालविताना सतर्कता बाळगा

0
49

– कचरा संकलक व वाहनचालकांसाठी मनपाची कार्यशाळा

नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालक व कर्मचाऱ्यानी घराघरातून कचरा संकलित करताना कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होईल याची दक्षता घेत, वाहन चालविताना वाहतून नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी. वाहन चालकांची क्षणाची घाई, अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकते किंवा जिवावरही बेतू शकते, असा मोलाचा संदेश नागपूर महानगरपालिकेने गुरुवारी (ता. २५) आयोजित केलेल्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालक व कर्मचाऱ्याच्या क्षमता बांधणी कार्यशाळेत देण्यात आला.

नागपूर महानगरपालिकेने स्वच्छता ही सेवा २०२५ या अभियानाअंतर्गत नागपूर शहरातील कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालक व कर्मचाऱ्याच्या क्षमता वाढविण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्वलित करून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या झाले. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त  राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी, प्रशिक्षक रविंद्र परांजपे, उपस्थित होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन करताना अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी शहराला पर्यावरणपूरक राखण्यात कचरा संकलकांची मोठी भूमिका असल्याचे सांगितले. लोकांच्या सवयींकडे लक्ष न देताना घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

यावेळी बोलताना उपायुक्त राजेश भगत यांनी जीवनात वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. केवळ एका क्षणाची चूक आपल्याला आयुष्यातून उठवू शकते. या चुकीचे परिणाम संबंधित व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबियांना आयुष्यभर भोगावे लागतात. यामुळे वाहने चालविताना काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी एजी एन्व्हायरो समीर टोणपे यांनी उपायुक्त  राजेश भगत यांचे स्वागत केले. तर बीव्हीजीचे  गणवीर यांनी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांचे स्वागत केले.

शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या वाहन चालक व इतर कर्मचाऱ्यांची मोठी भूमिका असते. त्यांच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी वाहतूक व कचरा संकलन या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. वाहतुकीच्या संदर्भात रविंद्र परांजपे यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या संदर्भात विविध सूचना केल्या.

यावेळी कचरा संकलन करताना घ्यावयाच्या सूचनांच्या संदर्भात ह्युमन मॅट्रिक सेक्युराईटचे महेंद्र चिल्हाटे यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून कचऱ्याचे योग्य वर्गीकरणाबद्दल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. उपायुक्त राजेश भगत यांनी तुळशीचे रोपटे देऊन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांचे स्वागत केले. यावेळी प्रशिक्षक रविंद्र परांजपे व महेंद्र चिल्हाटे यांचा शाल, व महानगरपालिकेचा मानाचा दुपट्टा देऊन उपायुक्त राजेश भगत यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन दमयंती चातुरकर यांनी केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी कचरा वर्गीकरणाबद्दल पथनाट्य सादर करण्यात आले.