spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आंतरराष्ट्रीय बुद्ध विचारातून साकारलेले ड्रॅगन पॅलेस खरोखरच अद्भुत – मुख्यमंत्री फडणवीस

– दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव उत्साहात संपन्न

– ऐतिहासिक ड्रॅगन पॅलेस येथे अनुयायांची प्रचंड गर्दी

कामठी :- “आंतरराष्ट्रीय बुद्ध विचारातून उभे राहिलेले ड्रॅगन पॅलेस हे केवळ महाविहारच नाही, तर संपूर्ण जगासाठी बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारे अद्भुत केंद्र आहे. नागपूरला दीक्षाभूमीची आंतरराष्ट्रीय ओळख मिळाल्यानंतर आता ड्रॅगन पॅलेसचे नावही त्या यादीत तेजोमयपणे झळकत आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे आयोजित भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. त्यामागे गौतम बुद्धांचा समता व बंधुतेचा विचार स्पष्टपणे दिसून येतो. संविधानाच्या माध्यमातून आपण त्या विचारांचा प्रसार जगभर करीत आहोत. धम्म म्हणजे फक्त उपदेश नव्हे, तर आचरण आहे. पंचशीलाच्या शिकवणी आत्मसात करून आचरणात आणणे हेच आजच्या दिवसाचे खरे स्मरण आहे.”

त्यांनी पुढे अधोरेखित केले की, “लोकांना दीक्षाभूमीला जाऊन वंदन करण्याची ओढ असते. पण आता त्यासोबतच ड्रॅगन पॅलेसलाही भेट देऊन बुद्ध वंदना करण्याची प्रेरणा मिळत आहे. ॲड. सुलेखा कुंभारे यांनी या पवित्र ठिकाणाहून बुद्धांचा धम्म जगापर्यंत पोहोचविण्याचे कार्य हाती घेतले आहे, ही समाजासाठी गौरवाची बाब आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळे आणि ॲड. कुंभारे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करून झाली. भिक्षुसंघाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना संपन्न झाली. त्यानंतर ड्रॅगन पॅलेस परिसरात भारतीय संविधानाच्या जगातील सर्वात मोठ्या प्रतिकृती निर्मितीचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.

दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सवाला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांतून हजारो अनुयायी सहभागी झाले. डोक्यावर शिदोरी आणि पाठीवर संघर्ष घेऊन आलेल्या या अनुयायांच्या श्रद्धेने ड्रॅगन पॅलेस परिसर खचाखच भरून गेला.

या भव्य सोहळ्यामुळे कामठीतील ड्रॅगन पॅलेस पुन्हा एकदा बुद्ध विचार, समता आणि बंधुतेच्या संदेशाने उजळून निघाले.

ड्रॅगन पॅलेस येथे अनुयायांची लाखोंची गर्दी, सामाजिक संघटना व पोलिस यंत्रणेच्या सेवेमुळे उत्सवात भर 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेंपल परिसरात यंदा अनुयायांची अभूतपूर्व गर्दी झाली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल पाच ते सात लाख अनुयायांनी येथे हजेरी लावली. बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या अनुयायांमुळे ड्रॅगन पॅलेस परिसर श्रद्धा आणि आस्थेने दुमदुमून गेला.

इतक्या मोठ्या संख्येने अनुयायांची उपस्थिती असूनही कुठलीही गैरसोय भासू नये यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला. भोजनदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्यसेवा, माहिती केंद्रे आदी सुविधा उभ्या करून अनुयायांना समाधानाचा अनुभव दिला.

सामाजिक संघटनांच्या सेवेला पोलिस यंत्रणेची उत्तम साथ लाभली. वाहतूक कोंडी टाळणे, सुरक्षेची काटेकोर खबरदारी, हरवलेल्यांना शोधून देणे अशा विविध जबाबदाऱ्या पोलिसांनी अत्यंत दक्षतेने पार पाडल्या.

सामाजिक संघटना आणि पोलिस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे लाखो अनुयायांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध वातावरण टिकून राहिले. परिणामी, ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे झालेला हा उत्सव अनुयायांसाठी संस्मरणीय ठरला.

Popular Articles