– दोन बोलेरो पिकअपसह सात जनावरे जप्त; ९.०५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
पंकज परशुरामकर,नवेगावबांध :– धाबेपवणी ते कोहलगाव मार्गावरून गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने नवेगावबांध पोलिसांनी रविवारी (दि. ११) पहाटे ४ वाजताच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत दोन बोलेरो पिकअप वाहनांसह सात गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून, एकूण ९ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धाबेपवणी ते कोहलगाव मार्गावर ही कारवाई करण्यात आली. दोन बोलेरो पिकअप वाहनांतून गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित वाहनांची कारवाईदरम्यान तपासणी केली. यावेळी दोन्ही वाहनांमध्ये एकूण सात गोवंश जनावरे आढळून आली.
पोलिसांनी सात जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ५ हजार रुपये, तर दोन बोलेरो पिकअप वाहनांची किंमत ८ लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. जनावरे आणि वाहने मिळून एकूण ९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नवेगावबांध पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पहाटेच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये आरोपींची नावे, वाहनचालकांची माहिती आणि जनावरांच्या वाहतुकीमागील उद्देश याबाबत तपशील देण्यात आलेला नाही.







