spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नाणारच्या खाडीत चार भावंडे बुडाली

– चौघांचा मृत्यू तर एकीला वाचविण्यात यश

राजापूर :- राजापूर तालुक्यातील नाणार येथील इंगळवाडी परिसरात खाडीमध्ये कालवे (शिंपले) पकडण्यासाठी गेलेल्या चार भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रविवारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाच लहान मुले खाडीतील खोल पाण्यात बुडाली. त्यापैकी एका मुलीला वाचविण्यात यश आले; तर मोहम्मद, जुहेरिया आणि बुशिरा या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. माहिरा या १५ वर्षीय मुलीचा शोध सुरू असून, एकाच कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे नाणारसह राजापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाणार येथील इंगळवाडी परिसरात राहणारे जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या आपल्या मुलांसह दुपारी साडेतीनच्या सुमारास खाडीमध्ये मुळे आणि कालवे काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील खाडीपात्रात कालवे काढत असताना मुले पाण्याजवळ होती. दरम्यान, सायंकाळी साडेचारच्या सुमारास खाडीपात्रातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले एकापाठोपाठ पाण्यात बुडू लागली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मुलांचा आरडाओरडा ऐकून त्यांना वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली. उपस्थितांनी पाण्यात उतरून मुलांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. या प्रयत्नांत एका मुलीला वाचविण्यात यश आले; मात्र उर्वरित चार मुलांना वाचविता आले नाही.

या दुर्घटनेत मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे), जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे), बुशिरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे) आणि माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे) ही चार भावंडे खाडीच्या खोल पाण्यात बुडाली.

Popular Articles