spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जत्रा-यात्रांमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर FDA चा वॉच

– परवाना अनिवार्य, भगरीच्या विक्रीवरही लक्ष 

मुंबई :- नवरात्रोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA ने अन्नसुरक्षेबाबत कडक पावले उचलली आहेत. मंदिर परिसरात, जत्रा-यात्रांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या स्टॉल्ससह तात्पुरत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही आता FDA च्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी तसेच महाप्रसाद, भंडारा किंवा लंगरचे आयोजन करण्यासाठी संबंधित विक्रेत्यांकडे आवश्यक परवाना किंवा नोंदणी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.

यात्रा जत्रांमध्ये स्टॉल लावत असाल तर सावधान!

नवरात्रोत्सवात मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होते. याच काळात विविध ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले जातात. अनेक सार्वजनिक मंडळे, मंदिरे आणि धार्मिक संस्था महाप्रसाद किंवा भंडाऱ्याचे आयोजन करतात. मात्र, या ठिकाणी विकले जाणारे किंवा भाविकांना दिले जाणारे खाद्यपदार्थ सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा, जत्रा किंवा गर्दीच्या ठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच महाप्रसाद किंवा भंडाऱ्याचे आयोजन करताना संबंधित केटरिंग व्यावसायिकाकडे अधिकृत परवाना आहे की नाही, याची खात्री सार्वजनिक मंडळे, मंदिर प्रशासन आणि विश्वस्तांनी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भगरीच्या विक्रीवरने साठवणुकीवर FDAचे लक्ष

दरम्यान, नवरात्रोत्सवात उपवासासाठी भगरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, भगरीच्या सेवनामुळे विषबाधा झाल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यामुळे यंदा भगरीची विक्री आणि साठवणूक यावर FDA विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे. भगरीची गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय, महाप्रसादासाठी किंवा घरगुती वापरासाठी खाद्यपदार्थ खरेदी करताना ते कुठून खरेदी केले, याची पावती आणि इतर तपशील काही काळ जतन करून ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्नामध्ये काही दोष आढळल्यास संबंधित विक्रेता किंवा पुरवठादाराचा माग काढण्यासाठी या नोंदी उपयोगी ठरू शकतात. यामुळे सण-उत्सवांच्या काळात खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे आणि नागरिकांनीही अन्नाच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Popular Articles