पंकज परशुरामकर, नवेगाव बांध :- येथील स्व. छगन विठोबा डोंगरवार यांचा अंत्यविधी कार्यक्रम रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी नवेगाव बांध येथील मोक्षधाम येथे पार पडला. दुःखाच्या या प्रसंगी कोहळी समाज मंडळ, नवेगाव बांध यांनी माणुसकीचे दर्शन घडवत त्यांच्या कुटुंबीयांना १० हजार रुपयांचा मदतनिधी दिला.
अंत्यविधीप्रसंगी एकूण १४ हजार ६२५ रुपये जमा झाले होते. त्यापैकी चार व्यक्तींच्या मजुरीसाठी १ हजार १०० रुपये देण्यात आले. उर्वरित रकमेतून ३ हजार ५२५ रुपये मंडळात जमा ठेवण्यात आले, तर उरलेली १० हजार रुपयांची रक्कम मदतनिधी म्हणून देण्यात आली.
कोहळी समाज मंडळ, नवेगाव बांधचे अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत, स्व. छगन विठोबा डोंगरवार यांच्या कुटुंबीयांना त्यांचे कुटुंबीय व आप्तेष्टांच्या उपस्थितीत हा मदतनिधी सुपूर्द करण्यात आला.
संकटाच्या काळात समाजबांधव एकत्र येऊन गरजू कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिल्याने सामाजिक एकोपा, सहकार्य आणि माणुसकीचे दर्शन घडले. कोहळी समाज मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.








