– पांढरकवडा नगरपरिषद खुला प्रवर्गासाठी राखीव
सुरज बंडीवार, पांढरकवडा :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘मिनी विधानसभा’ निवडणुका मानल्या जात असल्याने याचे राजकीय महत्त्व मोठे आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. स्थानिकच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून त्यापार्श्वभूमीवर दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी राज्यातील १४७ नगरपंचायती आणि २४७ नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे आरक्षणही या सोडतीत निश्चित करण्यात आले. जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा आणि तोटा होईल हे आता निवडणुकीवेळीच स्पष्ट होईल. यवतमाळ जिल्ह्यात ९ नगरपरिषद आणि ६ नगरपंचायत आहेत. त्यापैकी यवतमाळ व वणी अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्ग, पांढरकवडा, दारव्हा, उमरखेड, पुसद, घाटंजी या नगरपरिषदा खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. तर आर्णी, दिग्रस अनुसूचित जाती महिला तर नगरपंचायतीसाठी कळंब नगरपंचायतचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव झाले आहे. तसेच मारेगाव, झरीजामणी नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी तर बाभुळगाव, राळेगाव, महागाव हे नगरपंचायत खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.








