– भंडारा जिल्ह्यातील मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सेंदूरवाफा (ता. साकोली) :- “बदलत्या निसर्गचक्रामुळे आणि हवामानातील तीव्र बदलांमुळे पारंपरिक पिकांची (कापूस, सोयाबीन, धान) उत्पन्नता घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नव्या दृष्टीने शेतीकडे पाहिले पाहिजे. ‘पिक पॅटर्न’मध्ये बदल करून ऊसासारखी नगदी पिके, दुग्धव्यवसाय, शेळीपालन यासारख्या कृषिपूरक व्यवसायांकडे वळण्याची गरज असून कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान विकसित व्हावे व प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे हेच ध्येय आहे,” असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी मांडले.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा आणि करडी येथे मानस उद्योग समूहाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार डॉ. परिणय फुके, माजी खा. सुनील मेंढे, आ. विजय रहांगडले, आ. राजू कारेमोरे भोजराम कापगते, डॉ हेमकृष्ण कापगते, हेमंत पटले, तारिक कुरेशी, प्रकाश बाळबुधे, समय बनसोड यांच्यासह जिल्हाधिकारी सावनकुमार, पोलीस अधिक्षक नरुल हुसैन आदी मान्यवर उपस्थित होते.
“विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा वापर व्हावा आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा माझा मुख्य हेतू आहे,” असे सांगताना ना. गडकरी यांनी ‘ऍग्रोव्हिजन’ उपक्रमाची सुरुवात याच विचारातून झाल्याचे स्पष्ट केले.
“इस्रायल, स्पेन यासारख्या देशांमध्ये शेतकऱ्यांना अभ्यासदौऱ्यावर नेले. तिथल्या प्रगत शेती पद्धतीचा परिणाम संत्रा, ऊस यासारख्या पिकांच्या लागवडीवर झाला आहे. आता शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे पाहावे लागेल,” असे ते म्हणाले.
ना. गडकरी यांनी सध्याच्या आधुनिक काळात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन, माती परीक्षण, जल व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन तंत्र यांचा वापर अत्यावश्यक असल्याचे सांगितले. “AI तंत्रज्ञानाचा ऊस शेतीसाठी योग्य वापर केला, तर उत्पादन व गुणवत्तेत लक्षणीय वाढ होऊ शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ना. नितीन गडकरी म्हणाले, “ऊसापासून इथेनॉल आणि जैविक खत तयार करून त्यातून देशाचा आणि शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ऊसाचे एकूणच आर्थिक मूल्य फार मोठे आहे. यामुळेच मानस ने भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा साखर कारखाना अडचणीत असतानाही चालवायला घेतला. आज तो कारखाना यशस्वीरित्या सुरु असून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “साखर उद्योग हा केवळ साखर निर्मितीसाठी नाही, तर त्यात इथेनॉल, बायोगॅस, जैव खत, आणि ऊर्जेचे उत्पादनही शक्य आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्य अत्यंत उज्वल आहे.” इथेनॉल कडे पर्याय इंधन म्हणून बघितले जावे तसेच या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचे परकीय चलन वाचेल आणि थेट शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
ना. नितीन गडकरी यांनी दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यासारख्या कृषिपूरक व्यवसायांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक शेती आणि पुरक उद्योगांनी शेतकऱ्यांचा आर्थिक कणा बळकट होऊ शकतो.”
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
या शेतकरी मेळाव्याला भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात मानस उद्योग समूहाचे पदाधिकारी, कृषी तज्ज्ञ, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि विविध कृषी संस्था प्रतिनिधीही उपस्थित होते. कार्यक्रमात शेतीतील नवतंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, कृषिपूरक व्यवसायांसाठी उपलब्ध असलेल्या निधीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.




