spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ पूर्व तयारी बैठकीत उद्योग व शेती क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले विचार

– विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

नागपूर :- येत्या १२ ऑक्टोबर रोजी आयोजित होणाऱ्या ‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळे’च्या तयारीच्या दृष्टीने आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत नागपूर व परिसरातील उद्योग आणि शेती क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचार मांडले. कार्यशाळेत नागरी क्षेत्र विकास, उद्योग, कृषी, वने, खाण या पाच गटांमध्ये तज्ज्ञ मंडळी विचार मांडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये नागपूर व परिसराच्या आर्थिक विकासासाठी कार्यपद्धती आखण्याच्या दृष्टीने नागपूर स्थित भारतीय व्यवस्थापन संस्थेमध्ये (आयआयएम) ‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या पूर्व तयारीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, अपर आयुक्त प्रशासन तेजुसिंग पवार, उद्योग व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह नागपूर व परिसरातील उद्योग आणि कृषी क्षेत्रातील संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. दूरदृष्यप्रणालीद्वारेही उद्योग आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला बळकट करण्याची आवश्यकता तसेच कृत्रिम बुध्दिमत्ता आधारित इन्क्युबेशन सेंटर उभारण्यास शासनाकडून मदत देण्याची अपेक्षा या बैठकीत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. भविष्याच्या दृष्टीने नवीन औद्योगिक क्षेत्र उभारणी, सेमीकंडक्टर निर्मिती आदी बाबींवरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला. शेतीक्षेत्राच्या सतत विकासाकरिता गावपातळीवर हवामान केंद्र, माती परिक्षण केंद्र उभारणे व गाव तिथे संशोधन केंद्र, पीक पद्धतीतील बदल, तंत्रज्ञानाचा उपयोग व स्मार्ट शेतीकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन, शितगृहांची उपलब्धता, शेतमाल उत्पादनावर भर देणे आदी सूचना यावेळी देण्यात आल्या.

नागपूर व परिसरातील उपलब्ध स्त्रोतांचा प्रभावी उपयोग करुन विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक थिंक टँक निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.