– कृषी विभागाचा पुढाकार
नागपूर :- हवामान विषयक माहिती, पीक सल्ला, खत व किटकनाशकाबाबत माहिती असे शेती विषयी संपूर्ण माहितीचे दालन ‘महाविस्तार एआय ॲपद्वारे’ आता कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी खुले केले आहे. नागपूर विभागातील शेतकऱ्यांनी या ॲपचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे.
या ॲपद्वारे शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारी खताची मात्रा, किड व रोगविषयी माहिती, उत्पादित केलेल्या मालाचा बाजारभावही बघता येणार आहे. शेतीसाठी लागणारी यंत्र, अवजारे भाडेतत्वावर मिळविण्याकरिता त्यांच्या गावाजवळ असणाऱ्या अवजारे बँकांची माहिती देखील या ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच महाडिबीटीवरील योजनांकरिता अर्ज कसा करावा याबाबतची सविस्तर माहिती या ॲपमध्ये आहे. शेतीशाळा तसेच तंत्रज्ञानाचे व्हिडिओ देखील या ॲपमध्ये आहे.
असे करा लॉगीन
महाविस्तार एआय ॲप डाऊनलोड करुन शेतकरी आयडीद्वारे लॉगीन करुन आपले नाव, गाव, तालुका प्रविष्ट केल्यास गावनिहाय तसेच तालुकानिकाय सर्व माहिती ॲपच्या होम पेजवर शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. ‘मला प्रश्न विचारा’ या ॲपमध्ये जाऊन शेतकरी प्रश्नांचे निराकरण करु शकतात.




