सुरज बंडीवार, पांढरकवडा :- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत कधी होणार? असा सवाल करण्यात येत होता. अखेर याबाबतची प्रतीक्षा संपली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे. केळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेतील ४ सदस्य पदांकरिता आरक्षण सोडत सोमवारी (दि. १३) रोजी काढण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी पंचायत समितीच्या ८ सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव जागा निश्चित करावयाच्या आहेत. याकरिता सोमवारी दुपारी ११:०० वाजता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पाटणबोरी, पहापळ, उमरी, करंजी या जिल्हा परिषद गटाकरीता तर मोहदा, करंजी, सायखेडा, उमरी, मांगुर्डा, पहापळ, बोथ, पाटणबोरी या पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीकरीता सभा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक नोडल अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन यांनी दिली.



