spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चौकीदार” या काव्यसंग्रहाचे थाटात लोकार्पण

नागपूर :- नागपुरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, भाष्यकार प्रबोधनकार कवी लेखक माणिकराव खोब्रागडे यांचा हिंदी काव्यसंग्रह “चौकीदार” याचे लोकार्पण उत्तम प्रतिसादात हिंदी मोर भवन, हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात नुकतेच संपन्न झाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर साहित्यिक मंडळी उपस्थित होती. या लोकार्पण समारंभाची अध्यक्षता प्रसिद्ध कवी शायर डॉ. सागर खादीवाला यांनी केली. मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक, प्रबोधनकार प्रा. जावेद पाशा कुरेशी, प्रसिद्ध शायर शब्बीर अहमद विद्रोही, प्रसिद्ध कवी लेखक डॉक्टर भोला सरवर, हिंदी साहित्यातील प्रसिद्ध लेखिका हेमलता मिश्र मानवी उपस्थित होते. कवी माणिकराव खोब्रागडे आणि उपस्थित लोकांनी महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि मोमबत्ती पेटवून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत “चौकीदार” या संग्रहाचे प्रकाशन केल्या गेले. प्रमुख पाहुणे प्रा. जावेद पाशा कुरेशी म्हणाले की शोषण, अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लेखक आणि साहित्यकार कवी हा बेदरकारपणे उभा राहिलेला आहे. म्हणून व्यवस्थेचा पहिला हल्ला याच लोकांवर होत असतो. कवी माणिकराव यांचा चौकीदार स्पष्टपणे संदेश देतो की संविधान आणि लोकशाहीचे दोन चौकीदार आहेत. एक स्वतः जनता आणि दुसते संसदेत बसलेले लोक! परंतु जनप्रतिनिधी आणि त्यांचे म्होरके जर संविधान विरोधी कार्य करीत असतील तर संविधानाची आणि लोकशाहीची खरी चौकीदारी ही जनतेच्या हातात असते. या काव्यसंग्रहामध्ये वर्तमानातील समग्र समाज जीवनाचे यथोचित चित्रण आलेले आहे. ते स्वतः म्हणतात त्यांची विचारधारा फुले, शाहू, आंबेडकरी आहे, त्यामुळे साहित्यातील गुलाबी शब्दांपेक्षा असेल त्या शब्दानुसार समाजाचे वास्तव मांडण्यासाठी त्यांनी चौकीदारी केलेली आहे. चौकीदार हा संग्रह अत्यंत प्रखर भाष्य करणारा आहे.

प्रसिद्ध शायर शब्बीर अहमद विद्रोही म्हणाले की सध्याच्या परिस्थितीमध्ये असले काव्यसंग्रह आणणे म्हणजे कवी आणि लेखकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करणे आहे. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्यिका हेमलता मिश्र म्हणाल्या की कवी माणिकराव खोब्रागडे यांच्या कविता वाचकाला वास्तवाच्या जवळ घेऊन जातात. आधुनिक राजकारणाचा परिणाम पारंपारिक एकतेला तडा देण्यासाठी कसा जबाबदार आहे, यात महिलांच्या शोषणापासून तर आधुनिक काळामध्ये महिलांच्या स्थितीचे यथोचित वर्ण अनेक कवितांमध्ये त्यांनी केलेले आहे. हिंदी साहित्यात चौकीदार हा काव्यसंग्रह नाविन्यपूर्ण आहे! प्रमुख पाहुणे डॉक्टर भोला सरवर यांनी संपूर्ण काव्यसंग्रहाच्या निर्मितीची प्रक्रिया श्रोत्यांसमोर मांडली. माणिकराव यांच्या जीवनाशी प्रामाणिकतेची कशी घट्ट मैत्री आहे हे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाध्यक्ष डॉ. सागर खादीवाला यांनी या काव्यसंग्रहाचे या काळातील महत्त्व फार सुंदरपणे मांडले. मुक्तछंदातील फुले शाहू आंबेडकर विचारांची परंपरा सांगणारा हिंदी साहित्यातील हा आगळावेगळा कवितासंग्रह असल्याचे त्यांनी विशद केले. ते पुढे म्हणाले की केवळ प्रामाणिक कवीच असा बेदरकारपणे व्यवस्थेशी सरळ संघर्ष घेऊ शकतो. कारण कवी ज्या वैचारिक भट्टीतून आलेला आहे ती कच्चे मडके नव्हे तर लोहारासारखी सुदृढ आणि तीक्ष्ण आणि टनक साहित्यकृती निर्माण करीत असतो. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन कवी मनोहर गजभिये यांनी केले, प्रास्ताविक कवी संजय गोडघाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शायरा रोशनी अंबर गणवीर यांनी केले. यावेळी साहित्यातील अनेक मंडळींचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.