– मृत व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचा कुठे ?
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- कुठल्याही गावात गेले असता तिथे नदी किंवा तलावाच्या कडेला स्मशानभूमी असतेच. कारण माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीतच केले जातात. मात्र, महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे जिथे स्मशानभूमीच नाही. आजनी असं या गावाचं नाव असून, सुरुवातीपासूनच या गावात स्मशानभूमी नाही. त्यामुळे या गावात कुणाचं निधन झाल्यास काशिनाथ मंगलू शेंडे या शेतकऱ्याच्या शेतात नाल्याच्या किनारी अंतिम संस्कार केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात हीच परिस्थीती आहे. स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेहावर अंन्त्यसंस्कार कुठे करायचे? असा प्रश्न कुटुंबियांना पडत असतो. तेव्हा ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेता सरपंच मनोज लिल्हारे यांची स्मशानभूमीसाठी जागा मिळावी म्हणून शासनाकडे धावपळ सुरू केली आहे.
रामटेक तालुक्यातील आजनी हे गाव रामटेक पासुन १० किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये स्मशानभूमीच नाही. त्यामुळे गावातील मृत व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे असल्यास गावकऱ्यांना गावापासून दूर २ किलोमीटर अंतरावर असलेल्या काशिनाथ मंगलू शेंडे यांच्या शेतात नाल्याकाठी जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. स्व. काशिनाथ मंगलू शेंडे हे आता हयात नाहीत परंतु त्यांचे वारसदार मौजा आजनी येथील प.ह.नं. ३९ सर्वे क्र. १३९ आराजी ०.१९ आर जमा ०.२५ हक्क वर्ग १ ही शेतजमीन मोबदला मिळाल्यास शासकीय दराप्रमाणे ग्रा.पं. कार्यालय आजनीला स्मशानभूमी करिता देण्यास तयार आहेत. परंतु ग्रा.पं. उत्पन्न हे घरकर व पाणीकर यावरच अवलंबून असल्याने त्यांना ही जागा घेणे शक्य नाही. करिता सरपंच मनोज लिल्हारे यांची ही जागा ग्रामपंचायतला मिळावी करिता शासनाकडे धावपड सुरु आहे. वेळोवेळी ग्रामपंचायतने शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु अजूनपर्यंत आजनीवासीयांना स्मशानभूमीसाठी जागा मिळालेली नाही. देशात लोकशाही येऊन इतकी वर्ष झाली तरीही आम्हाला अंत्यसंस्कारांसाठी हक्काची स्मशानभूमी मिळत नाही, ही शासनासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दांत येथील ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
शासन दरबारी आमच्या मागणीला काहीच किंमत नाही
ग्रामपंचायतने प्रशासनाकडे याबद्दल वेळोवेळी पाठपुरावा देखील केला. मात्र, शासन दरबारी आमच्या मागणीला काहीच किंमत नसल्याचं दिसतंय. ग्रामस्थ शेतात किंवा नदीच्याकडेला मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करतात. गावाला स्मशानभूमी न देणे हा एकप्रकारे त्या पार्थिवाचा अपमान होत आहे.
– मनोज लिल्हारे (सरपंच आजनी)




