– प्रविण किणे यांचा प्रशासनाविरोधात संविधाननिष्ठ सत्याग्रह आंदोलन
रत्नागिरी :- रत्नागिरीतील समाजसेवक प्रविण किणे यांनी जिल्ह्यातील RTO, जिल्हाधिकारी, CEO व पोलीस अधीक्षक कार्यालयातील सुरू असलेल्या भ्रष्टाचार, दिरंगाई व अन्यायाविरोधात लक्षवेधी उपोषणाची घोषणा केली आहे.
प्रविण किणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले होते, त्यावेळी प्रशासनाकडून काही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, आजतागायत ती आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत.
किणे यांनी आरोप केला आहे की, Collector व CEO कोणत्याही पत्रास उत्तर देत नाहीत, तसेच प्रश्न विचारल्यास त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो. “प्रशासनातील अधिकारी व काही राजकीय व्यक्तींनी माझी फसवणूक करून उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. पण आजही न्याय मिळालेला नाही,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की,
“मी भारतीय संविधानातील अनुच्छेद 19(1)(a) व 19(1)(b) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य व शांततामय आंदोलनाचा हक्क वापरत आहे. माझा सत्याग्रह हा पूर्णपणे शांततामय, कायदेशीर आणि संविधाननिष्ठ असेल.”
या पार्श्वभूमीवर प्रविण किणे यांनी जाहीर केले आहे की ते दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ पासून मारुती मंदिर, रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर, आम्रवृक्षाखाली अनिश्चितकालीन लक्षवेधी उपोषणास प्रारंभ करणार आहेत.
किणे यांनी सांगितले की,“२०१४ पासून माझ्या अर्जांना प्रशासनाकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. मी लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी उपोषण करीत आहे. जर उपोषणादरम्यान मला काही अनिष्ट घडले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी आणि राजकीय व्यक्तींवर असेल.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, हे उपोषण भ्रष्टाचारविरोधी व जनजागृतीसाठीचे शांततामय सत्याग्रह आंदोलन असून, ते न्याय मिळेपर्यंत सुरू राहील.








