– सातत्याने गैरहजर राहत असल्याने आयुक्तांकडून कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील विनापरवानगी सातत्याने गैरहजर असणाऱ्या २९ सफाई कर्मचाऱ्यांवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली.
नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई मजदुरांच्या अनुपस्थितीबाबत तक्रारी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना वारंवार प्राप्त होत होत्या. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, गेल्या २० ऑक्टोबरला दहाही झोन अंतर्गत प्रभागनिहाय हजेरी स्टँडवरील सफाई मजदुरांच्या हजेरी रजिस्टरची तपासणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी वारंवार हजेरी पॉईंटला भेटी देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी केली होती. या तपासणी दरम्यान हजेरी रजिस्टर मध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या नावासमोर गैरहजर बाबत नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांची पडताळणी केल्यानंतर २० दिवस व त्यापेक्षा अधिक दिवसापासून गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.




