तिरोडा :- अलीकडच्या काही दिवसांत तिरोडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः धान पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेले घास हिसकावल्याने बळीराजाचे जगणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्ष यांच्यावतीने मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदन तहसीलदार तिरोडा यांना देण्यात आले. व शासनाकडे तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. पक्षाने दिलेल्या निवेदनात मागण्या करण्यात आल्या आहेत —
संपूर्ण तिरोडा तालुक्यातील सर्व गावांमध्ये सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नोंद करावी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.
पिकविमा योजनेतील लाभ त्वरित वितरित करण्यात यावा.
रब्बी हंगामातील धान पिकाचे थकीत चुकारे आणि बोनसची रक्कम तत्काळ वितरित करण्यात यावी.
तिरोडा तालुक्यातील सर्व ३६ शासकीय आधारभूत केंद्रे तत्काळ सुरु करण्यात यावीत.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेऊन शासनाने न्याय्य व पुरेशी मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. स्थानिक प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा सुरू करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
यावेळी तालुका अध्यक्ष कैलास पटले, कार्याध्यक्ष नासिर घानिवाला, शहर कार्याध्यक्ष रजनीकांत शरणागत, अनुसूचित जमाती आघाडी जिल्हाध्यक्ष संजय धुर्वे, विजय बुद्धे, सरपंच रविंद्र भगत, संजय रहांगडाले, मंगेश गेडाम, वनिता डोंगरे, खेमेश रहांगडाले, संकेश शामकुल आदि पदाधिकारी उपस्थित होते.




