खापा :- गांधी जयंती लोटून चक्क एक महिना पूर्ण झाला. पण बाजार चौक येथे स्थित महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या साफ सफाईचा ठाव ठिकाणा नाही. याअर्थी गांधीजींच्या पुतळ्याचा अवमान होत असताना दिसत आहे.
दोन ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पण हार हे वाळून तिथेच प्रतिमेवर दिसून येत आहे. तसेच अवकाळी पावसामुळे ही तो हार सडून कुजून गेला आहे. स्वच्छता विभागाची पोल खोल होत आहे. स्वच्छता विभागाकडून साफ सफाई करते वेळेची फोटो काढणे ही एक औपचारिकाता पार पाडण्यासाठी करण्यात येते की काय असा प्रश्न जनता करीत आहे. 
काही दिवसांपूर्वी प्रतिमेच्या सौंदर्यीकरण करण्यात आले. यात पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या झेंड्यावर ध्वजारोहण आणि झेंडावंदन करण्याकरिता वर चढण्यासाठी पायऱ्या बनविण्यात आल्या. पण त्या पायऱ्या इतक्या मोठ्या आणि इतका उंच आहे की, त्यावर चढणे अशक्य होते. दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सणानिमित्त ध्वजारोहण आणि झेंडावंदन करण्यात येते. कधी तर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पण करण्यात येते. अशा वेळेला जेष्ठ नागरिक अनावधानाने पडले अथवा त्यांना दुखापत झाली तर यासाठी कोण जबाबदार राहील? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. ठेकेदाराच्या अकुशल बांधकामामुळे गांधी प्रतिमेच्या परिसरात आणि राष्ट्रध्वजाच्या झेंड्याजवड झाडे निघून आलेली असून नवीनतम बांधकामाला भेगा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून नगरपालिकेच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. यावर काही निराकरण होईल काय? असाही प्रश्न शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.




