यवतमाळ :- महाटेट परीक्षा दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार असून या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेच्या पारदर्शक व सुरळीत आयोजनासाठी आवश्यक त्या सर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस जिल्हा सनियंत्रण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात या परीक्षेसाठी पहिल्या पेपरसाठी ४ हजार ४१६ तर दुसऱ्या पेपरसाठी ५ हजार ९५७ परीक्षार्थी बसणार आहेत. परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १.००, तर दुसरा पेपर दुपारी २.३० ते सायं. ५ या वेळेत घेण्यात येणार आहे.
पहिल्या पेपरसाठी १६ परीक्षा केंद्रे तर दुसऱ्या पेपरसाठी २३ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ४ केंद्रे मिळून १ झोन तयार करण्यात आला असून पहिल्या पेपरसाठी ४ झोन आणि दुसऱ्या पेपरसाठी ६ झोन स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर १ सहाय्यक परिरक्षक, तर प्रत्येक परीक्षा वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षार्थ्यांच्या फेस रिडिंग व मेटल डिटेक्शन तपासणीची सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी परीक्षास्थळी परीक्षेच्या किमान दीड तास आधी उपस्थित राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
प्रत्येक झोनसाठी १ झोनल ऑफिसर, १ व्हिडिओग्राफर आणि १ बंदुकधारी पोलीस यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून, सर्व केंद्रसंचालक, सहाय्यक परिरक्षक आणि झोनल अधिकारी यांच्या नियुक्त्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केल्या आहेत.
संपूर्ण परीक्षेचे सनियंत्रण शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. यवतमाळ हे जिल्हा नियंत्रक म्हणून तर शिक्षणाधिकारी माध्यमिक हे जिल्हा सहनियंत्रक म्हणून पाहणार आहेत. परीक्षेपूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर सभा आयोजित केली जाणार आहे.
परीक्षा साहित्याचे वितरण सर्व केंद्रसंचालकांना करण्यात येणार असून, जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सांगण्यात आले. लेखनिक व अनुग्रह कालावधी मागणी केलेल्या उमेदवारांनी परीक्षेपूर्वी महाटेट २०२५ जिल्हा सनियंत्रण कक्ष, शिक्षण विभाग (प्राथ), जि.प. इमारत, आर्णी रोड, यवतमाळ येथे संपर्क साधून आवश्यक परवानगी घ्यावी, असे शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी कळविले आहे.








