spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सामाजिक सेवा संस्थांनी कार्यकर्त्यांच्या कौशल्याच्या आधारे पारधी समाजास सक्षम करावे – भैय्याजी जोशी

– पारधी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांची एक दिवसीय कार्यशाळा नागपुरात संपन्न

नागपूर :- पारधी विकास परिषद विदर्भ प्रांतच्या वतीने पारधी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांची एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी रवि भवन नागपूर येथे संपन्न झाली.

कार्यशाळेस उद्घाटक म्हणून रा.स्व.संघाचे केंद्रिय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी हे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम हे उपस्थित होते. मंचावर पारधी विकास परिषदेचे मार्गदर्शक प्रदीप वडनेरकर, संयोजक आशिष कावळे, पारधी विकास परिषदेचे अध्यक्ष परशराम भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांनी वंदनीय भारतमाता व समशेरसिंग यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.

उद्घाटनपर भाषणात भैय्याजी जोशी म्हणाले की, प्रत्येक माणसाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. मग तो दुर्बल असो वा सक्षम असो, गरीब वा श्रीमंत असो. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार स्वतः आनंद घ्यावा व इतरांनाही आनंदी ठेवावे. दुर्बल घटकांना सक्षम घटकांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे. शिक्षित व अशिक्षित दोघेही पैसा मिळवू शकतात पण पैसे मिळविण्याचे मार्ग वेगवेगळे असु शकतात. त्या सर्व गोष्टींसाठी बुद्धीमत्ता व कौशल्य लागते. तुम्ही जन्म कुठे घेतला, कोणत्या जातीत, धर्मात घेतला यावर काहीही अवलंबून नसते. मात्र प्रत्येकाने योग्य मार्गाने चालावे असे ईश्वराचे वरदान आहे. आता जगण्यासाठी सर्व व्यवस्था निर्माण झाल्या आहेत, ज्या पूर्वी कधी नव्हत्या. जाण्यायेण्यासाठी वाहन, उदरनिर्वाहासाठी अनेक साधने, उद्योग, कारखाने, छोट्या मोठ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा योग्य वापर व्हावा‌ व चांगले जीवन जगावे. यासाठी सर्व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन दुर्बल व वंचित घटकातील पारधी समाजास उन्नत करावे त्यासाठी सेवा संस्थेतील कार्यकर्त्यांनी त्यांच्यात असलेल्या दैवी गुणांचा व कौशल्याच्या उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम म्हणाले, मला शासनाने वंचित समाजासाठी काम करण्याची संधी दिली. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो, अगदी शेवटच्या पालावर व बेड्यात गेलो. अजुनही शेवटच्या घटकांपर्यंत शासनाचे लाभ पोहोचले नाहीत ही शोकांतिका आहे. अजुनही पारधी समाजाची स्थिती समाधानकारक नाही. हे चित्र बदलण्यासाठी व या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे. एक आनंदाची व समाधानाची बाब म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ प्रेरित संस्था एकत्र येऊन या समाजासाठी झटत आहेत. मी सुद्धा मला दिलेल्या संधी द्वारे या समाजासाठी जे जे करता येईल ते ते करील असे त्यांनी आश्वस्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे मार्गदर्शक प्रदीप वडनेरकर यांनी केले. कार्यशाळेस विदर्भातून सामाजिक संस्थाचे ४७ प्रतिनिधी आले होते. कार्यशाळेत सामाजिक संस्थांनी आपले कार्य वृत्त सादर केले.

कार्यशाळेचा समारोप अतुल मोघे, प्रांत कार्यवाह, रा.स्व.संघ यांनी केला. त्यांचे स्वागत रूपेश पवार यांनी केले. सामाजिक संस्थांनी योजना तयार करून काम करावे,संघटन बांधणी करावी असे ते आपल्या मनोगतात म्हणाले. कार्यशाळेस रा.स्व.संघ विदर्भ प्रांत प्रचारक गणेश शेटे, पारधी विकास परिषदेचे अध्यक्ष परशराम भोसले, उपाध्यक्ष अमरसिंग भोसले, पारधी विकास परिषदेचे मार्गदर्शक प्रदीप वडनेरकर, आशिष कावळे, संयोजक सुनिल रत्नपारखी, कोषाध्यक्ष प्रविण पवार, महामंत्री विदर्भ प्रांत प्रशांत पवार, सह महामंत्री रूपेश पवार व इतर प्रांत कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

Popular Articles