यवतमाळ :- आज आपण संपर्क व संदेशवहन क्षेत्रात प्रचंड क्रांती झालेली पाहतो. त्यामागे शास्त्रज्ञांचे कठोर परिश्रम आहेत. शास्त्रज्ञ म्हणून पुढे येण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकाटी आणि यश प्राप्तीपर्यंत परिश्रमाची तयारी असावी लागते. केलेले संशोधन सामान्यांना परवडायलाही हवे. संशोधनाच्या क्षेत्रात विद्यार्थी, युवक पुढे येत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्याची गरज आहे. मुलांनी नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारी व्यक्ती बनण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. मुलांनो, जगाला दिशा देणारे शास्त्रज्ञ बना’ असा सल्ला यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी येथे दिला.
१३ व १४ नोव्हेंबर रोजी यवतमाळात आयोजित यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते तर प्रमुख अतिथी म्हणून एन आय सी च्या शास्त्रज्ञ शिवाणी सिंग, संस्थेचे सचिव विजय कासलीकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, गट शिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, विवेकानंदाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी, भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवि नगर, नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ तसेच विशुद्ध विद्यालयाचे वतीने आयोजित इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा उद्देश सांगितला.
संस्थेचे सचिव विजय कासलीकर यांनी यावेळी बोलताना ही मुले भविष्यातील शास्त्रज्ञ बनणार आहेत म्हणून सर्वांना शुभेच्छा दिल्या तर अध्यक्षीय भाषणात विशुद्ध व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते म्हणाले, विज्ञानाच्या युगात मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता अशा प्रकारच्या प्रदर्शनाला खूप महत्त्व आहे. ही सुरुवात असून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी सर्वांना कसून परिश्रम करावे लागेल.
प्रारंभी संगीत शिक्षक शिक्षक पूर्णाजी खानोदे व विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. शिक्षण विभागातील योगेश डाफ, वंदना नाईक, अनिल शेंडगे, स्मिता घावडे, दीपिका गुल्हाने यांनी मंचावरील उपस्थितांचे वैज्ञानिक गुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. उद्घाटन समारंभाचे संचालन वैशाली ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
यावेळी संगीता वेणूरकर व ऋतुजा गुल्हाने या परीक्षकांसोबतच आयोजन समितीतील शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच स्वागत समितीतील अध्यापक मंडळ व संघटनांचे पदाधिकारी, बाल वैज्ञानिक, त्यांचे मार्गदर्शक उपस्थित होते.








