सचिन चौरसिया,प्रतिनिधी
रामटेक :- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण ९८ नामनिर्देशनपत्र दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ९२ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, रामटेक नगर विकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढत मोठ्या उत्साहात नामांकन दाखल केले. यात शिवसेनेतर्फे बिकेंद्र महाजन, भाजपातर्फे ज्योती कोल्हेपरा, काँग्रेसतर्फे रमेश कारामोरे, तर रामटेक नगर विकास आघाडीतर्फे दामोधर धोपटे व आकाश ढोबळे यांनी अपक्ष नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले. तब्बल एकूण ९८ नामांकन अर्ज दाखल झाले असून कार्यालयात दिवसभर मोठी गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत, सुमारे १० वाजेपर्यंत, नामांकनपत्रांची तपासणी सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश कोळपे आणि मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी ही माहिती दिली. दरम्यान, कोणत्याही अप्रिय घटनेचा सामना होऊ नये म्हणून पोलिस दलाकडून परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तहसिलदारांनी नाकारला पत्रकारांना प्रवेश
निवडणुक निर्णय अधिकारी असलेले तहसिलदार रमेश कोळपे यांनी पत्रकारांनाच नगर परिषद कार्यालयात प्रवेश नाकारला. नगर परिषदेच्या गेटपर्यंतही पत्रकारांना येण्याची मुभा देण्यात आली नाही. तेव्हा यावेळी प्रतिनिधींनी तहसिलदार कोळपे यांना फोनवरून आत येण्याबाबदची मुभा देण्यात यावी असे म्हटले असता ‘ काय गरज आहे आत येण्याची असा प्रश्न केला, त्यावर ‘ वृत्तांकणासाठी यायचे आहे असे प्रतिनिधीने उत्तर दिले, मात्र यावर तहसिलदार कोळपे यांनी ‘ मी माहिती पाठविल असे म्हणत पत्रकारांना आत मध्ये येण्यास मज्जाव केला. याउलट घडीमध्ये रात्रिचे ९ वाजून २४ मिनीटे वाजले होते मात्र यावेळेपर्यंतही तहसिलदारांनी माहिती दिली नव्हती त्यामुळे पत्रकार मंडळींमध्ये आज तहसिलदारांप्रती मोठा संताप पहावयास मिळाला.








