spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मार्केटमध्ये हळदीला सोन्याचा भाव

– राज्यात हळदीचे भाव का वाढतायत?

मुंबई :- मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हळदीचे भाव वाढत चालले आहेत. दररोज हळदीचे दर बदलत असून उच्चांकी भाव मिळत आहे. पुढील काळात हळदीचा दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगलीसह आसपासच्या भागात हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. हळदीच्या पिकातून शेतकरी चांगला पैसा कमवतो. मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. हळदीला उच्चांकी दर मिळत आहे.

सांगलीमध्ये हळदीच्या दरामध्ये तेजी कायम आहे. शुक्रवारी पार पडलेल्या हळदीच्या सौद्यांमध्ये ३१ हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव हळदीला मिळाला आहे. गेल्या आठवड्यापासून हळदीला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सौद्यामध्ये चांगला दर मिळत आहे. प्रति क्विंटल ३० हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळाला होता. त्यामध्ये आता आणखी वाढ होऊन ३१ हजार १०० रुपये इतका दर हळदीला मिळाला आहे.

वाळवा तालुक्यातील शेतकऱ्याचा २० पोती हळदीला हा उच्चांक दर मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. हळदीचे भाव वाढत असल्याने शेतकरी खूश असले तरी हे सरकारी पातळीवरचं यश मुळीच नाहीये. एकूणच राज्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक परिस्थितीमुळे हळदीचे भाव गगनाला भिडत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

खरं तर, यंदा सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस पडला आहे. पाऊस न पडल्याने हळदीसह विविध पिकं करपून गेली आहेत. अशात ज्या शेतकऱ्यांनी आधीच हळदीचं उत्पादन काढून घेतलं आहे. त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता, येत्या काळात हळदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या किचनमध्ये भाजीचा रंग फिक्का दिसू शकतो.

Popular Articles