मुंबई :- खाद्यपदार्थांच्या भेसळ करणाऱ्यांविरोधात दंड थोपटलेल्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता भेसळयुक्त मसाल्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. मसाल्यांचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विक्री या संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत. हळद, मिरची, धने, जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडे, हिंग, केशर आणि मिश्र मसाल्यांसह सर्व प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
मसाल्यांमध्ये मेटॅनिल यलो, रोडामाइन बी, सुदान डाईज आणि लेड क्रोमेट यांसारख्या प्रतिबंधित रंगांचा वापर केला जातो. मसाल्यांचे वजन किंवा प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा, परकीय स्टार्च किंवा अन्य अनधिकृत पदार्थ मिसळले जातात. निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचे मिश्रण करणे किंवा अर्क काढून घेतलेल्या मसाल्यांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत उत्पादनापासून ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता, स्वच्छता आणि उत्पादनाचा मागोवा घेण्यासाठी एफडीएकडून अनुपानल आदेश जारी केले आहेत. मसाल्यांमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंग किंवा अन्य भेसळयुक्त पदार्थ मिसळणे, अस्वच्छ ठिकाणी मसाले वाळवणे आणि उत्पादनासंबंधी दिशाभूल करणारे दावे करणे याविरोधात राज्यभर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
थेट उत्पादक, पुरवठादारांवर कारवाई
– भेसळ आढळल्यास केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता थेट उत्पादक, पुरवठादार यांच्यासह अन्य दोषींवरही कारवाई केली जाणार आहे.
– मसाल्याची पूड आणि मिश्र मसाल्यांची सुट्या स्वरूपातील तसेच विनापॅकिंग विक्री संबंधित नियमांनुसार प्रतिबंधित करण्यात आली आहे. – मसाले सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारे, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्यांजवळ वाळवता येणार नाहीत. मसाल्यांची निर्जंतुकीकरण प्रक्रिया करताना इथिलीन ऑक्साइडचा वापर करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.
– या रसायनाच्या वापरामुळे संभाव्य कर्करोगकारक परिणामांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्देश देण्यात आला आहे.
परवान्याशिवाय उत्पादन. दळण करता येणार नाही. प्रत्येक अन्न व्यावसायिकाकडे व्यवसायाच्या स्वरूपानुसार वैध भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (एफएसएसएआय) परवाना किंवा नोंदणी असणे आवश्यक आहे. केवळ व्यापारी परवान्याच्या आधारे मसाल्यांचे उत्पादन किंवा दळण प्रक्रिया करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.








