किशोर साहू, मौदा, ता. २१ :- सध्या कोदामेंढी, अरोली, निमखेडा तारसा, चाचेर सह तालुक्यातील धान पीक कापणीला येणार असून, कापणीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक घेण्यासाठी धान लागवड केलेल्या शेतात गहू फेकलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे गेहू वापायला सुरुवात झाली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना सध्या फक्त युरिया खताची नितांत गरज आहे. मात्र युरिया व डीएपी खते निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दोन वर्षांपूर्वीपासून लिंकिंगची अट लादलेली आहे व दिवसेंदिवस ती वाढतच असल्याने शेतकरी मेटकुटीस आलेला आहे. लिंकिंगची अट लादणारया अशा कंपन्यांवर संबंधित वरिष्ठ अधिकारी , प्रशासन विभाग, मंत्रालयाने कडक कारवाई करून युरिया व डीएपी खत लिंकिंग विना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निमखेडा व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी कृषी केंद्रात गेल्यानंतर त्यांना युरिया खताबरोबर इतर लिंकिंगची पिकास पोषक औषधे सांगून पिकास अति आवश्यक नसलेल्या नॅनो युरियाच्या एक, दोन किंवा तीन बॉटल (प्रति बॉटल 250 रुपये) किंवा नॅनो डीएपी ची एक बॉटल (प्रति बॉटल 600 रुपये) घेतल्याशिवाय युरिया मिळणार नसल्याचे कृषी केंद्र संचालकांकडून सांगण्यात येत आहे. लिंकिंगची औषधे घेतल्याशिवाय कृषी केंद्रांनाही खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या युरिया देत नसल्याचे कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांना सांगत आहे. लिंकिंगच्या विरोधात दोन महिन्यांपूर्वी कृषी केंद्र संचालकांनी एक दिवसाचा सर्व दुकाने बंद ठेवून लाक्षणिक संप पूकारलेला होता. मात्र तरीही लिंकिंग सुरूच असल्याने लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी निमखेडा येथील शेतकरी राजेंद्र बरबटे, सुब्बाराव पुत्तोरी, सुरेश बरबटे सह निमखेडा व परिसरातील समस्त शेतकऱ्यांनी केली आहे.




