खापा :- खापा परिसरातील करजघाट, नंदापुर, गडेगाव व आजूबाजूच्या गावांमध्ये कपाशी पिकावर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांवर अक्षरशः संकटाचा डोंगर कोसळला आहे. आधीच अवकाळी पावसामुळे व अवर्षणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता लाल्या रोगाने पूर्णपणे मातीमोल केल्या आहेत.
कपाशीची झाडे अचानक लालसर होत असून पाने व फुले गळून पडत आहेत. काही ठिकाणी तर संपूर्ण शेत उजाड झाल्यासारखे दृश्य दिसत आहे. या रोगामुळे उत्पादनात तब्बल ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खत, बी-बियाणे, फवारणी यावर हजारो रुपये खर्च करूनही हाती काहीच येत नाही, अशी हतबलता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
“आता कर्ज कसे फेडायचे?” असा जिव्हाळ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने तातडीने पिकविमा मंजूर करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप उसळू शकतो, असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
नंदापुर, करजघाट, गडेगाव व खापा परिसरातील शेतजमिनी सध्या लाल्या रोगाने झाकोळल्या आहेत. हिरव्या कपाशीच्या शेतावर लाल पानांची उदासी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता हेच आज ग्रामीण वास्तव झाले आहे. शेती वाचवायची असेल तर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.








