– मनपा आणि ओएलएफच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा गौरव
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (ओएलएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करणारा एक महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या हस्ते मनपा शाळांमधील पाच शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कारने गौरविण्यात आले.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी साधना सयाम, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे, ओपन लिंक्स फाउंडेशनचे (विनोबा) प्रकल्प अधिकारी निखिल गजभिये यांच्यासह मनपाचे शिक्षक व शाळा निरीक्षक उपस्थित होते. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्याहस्ते पेंशन नगर उर्दू हायस्कूलचे शिक्षक आरिफ पठाण, कुंदनलाल गुप्ता उर्दू प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आशियाबानो सिद्दीकी, गरीब नवाज उर्दू हायस्कूलचे शिक्षक अब्दुल सालेम, शकीब मिर्झा, गरीब नवाज उर्दू-२ उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका रुखसाना परवीन यांचा ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
सदर पुरस्कार हा ओपन लिंक्स फाउंडेशनच्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत दिला जातो. नवोन्मेषी शिक्षण पद्धतींचा अवलंब करणाऱ्या आणि एफएलएन, वित्तीय साक्षरता, स्पेलिंग बी, स्पोकन इंग्लिश आणि महावचन यांसारख्या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ करणाऱ्या शिक्षकांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पुरस्कृत करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो.
‘कॉफी विथ ॲडिशनल कमिशनर’
मनपाच्या शिक्षण विभागातर्फे फाउंडेशन ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (एफएलएन Foundational Literacy and Numeracy) विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्स अत्यंत उत्साहात पार पडला. या बैठकीत २०० हून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला. शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करून कार्यवाही सुरू केली. या व्हर्च्युअल मीटिंगचे वैशिष्ट्य म्हणजे, शिक्षकांनी पाठवलेल्या वर्गातील उपक्रमांच्या व्हिडिओंचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी तीन शाळांतील शिक्षकांना ‘कॉफी विथ ॲडिशनल कमिशनर’ साठी विशेष आमंत्रण देऊन सन्मानित करण्यात आले. या बैठकीत शिक्षक आणि शाळा निरीक्षकांनी मागील लर्निंग आउटकम्स आणि उपक्रम शेअर केले. तसेच, पुढील दोन आठवड्यांसाठीच्या लर्निंग आउटकम्सवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले. अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि सशक्त दस्तऐवजीकरण यावर विशेष भर दिला.




