spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विधान परिषदेच्या गौरवशाली परंपरेला उपसभापती सचिन अहिर बळकटी देतील – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई :- विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रदीर्घ संसदीय, प्रशासकीय आणि सामाजिक अनुभवाचा लाभ विधान परिषदेला निश्चितच होईल. सभागृहाचे कामकाज निष्पक्ष, संयमाने आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडत ते विधान परिषदेच्या गौरवशाली संसदीय परंपरेला अधिक बळकटी देतील, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते.

उपसभापती प्रा. शिंदे म्हणाले, १९९९ पासून विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव असलेले सचिन अहिर संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर विधान परिषदेचे अकरावे उपसभापती ठरले आहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणून तसेच विरोधी पक्षातील सदस्य म्हणून जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे संसदीय कामकाजातील त्यांच्या अनुभवाचा उपसभापती म्हणून निश्चितच उपयोग होईल.

उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचे नसून अत्यंत जबाबदारीचे पद असल्याचे सांगून ते सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचे पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्ये आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचे कार्य उपसभापती सचिन अहिर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कामगार चळवळीत सचिन अहिर यांनी दिलेल्या योगदानाचाही सभापतींनी विशेष उल्लेख केला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावीत यासाठी सातत्याने प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले.

सभागृहातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने विधान परिषदेची प्रतिष्ठा, संसदीय मूल्ये आणि लोकशाही परंपरा अधिक उंचावण्यासाठी उपसभापती सचिन अहिर यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

उपसभापती म्हणून सर्वांना समान न्याय देणार -उपसभापती सचिन अहिर

सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.

उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर विधान परिषदेत आभार व्यक्त करताना उपसभापती अहिर बोलत होते.

एका सर्वसामान्य कामगार कार्यकर्त्याला सभागृहाने उपसभापतीपदाची जबाबदारी दिली असून “हा माझा वैयक्तिक सन्मान नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि कामगार चळवळीचा सन्मान आहे,” असे ते म्हणाले.

आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करताना उपसभापती अहिर यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील बालपण, चाळ संस्कृतीतील जीवन, परदेशातील नोकरीतील अपयश, खटाव मिलमध्ये वेल्डर मदतनीस म्हणून केलेले काम आणि त्यानंतर कामगार चळवळीतून सार्वजनिक जीवनात झालेला प्रवास सांगितला. कामगारांच्या प्रश्नांसाठी लढताना मिळालेल्या अनुभवामुळेच आजची जबाबदारी पार पाडण्याचे बळ मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सदस्यांचे आभार मानले.

उपसभापती म्हणून संसदीय परंपरा, सभागृहाची गरिमा आणि सर्व सदस्यांना न्याय देणे हेच आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असे स्पष्ट करत त्यांनी, “सभागृहात प्रत्येक सदस्याला समान संधी आणि न्याय मिळेल, यासाठी प्रामाणिकपणे काम करीन,” अशी ग्वाही दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.