नागपूर :- महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण व क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या शिक्षणोत्सव क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कवायतींचे प्रात्यक्षिके दाखवून सर्वांची मने जिंकली. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मनपा शाळांमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले.
शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विद्यापीठाच्या रविनगर येथील क्रीडा मैदानावर तीन दिवस चालणारा शिक्षणोत्सव क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून डॉ. अभिजीत चौधरी यांनी उद्घाटन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त मेघना वासनकर, उपायुक्त मिलिंद मेश्राम, समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी साधना सयाम, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे, उपशिक्षणाधिकारी संजय दिघोरे उपशिक्षणाधिकारी सीमा खोब्रागडे, विनय बगळे उपस्थित होते.

तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिका शाळेचे 5 हजारावर विद्यार्थी सहभागी होणार असून धावण्याची स्पर्धा, रस्सीखेच, गोळाफेक, लांब उडी, कबड्डी, खो-खो सारख्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या प्रारंभी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महानगरपालिकेचा ध्वज फडकावून स्पर्धेची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांनी पथसंचालन द्वारे आयुक्त यांना सलामी दिली. या पथसंचलनामध्ये डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळा, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक शाळा, दुर्गानगर माध्यमिक शाळा, विवेकानंद माध्यमिक शाळा, ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळा, पारडी उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलनात भाग घेतला. यावेळी शांततेचा संदेश देणारे फुगे आकाशात सोडण्यात आले. आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये संजय नगर माध्यमिक शाळा व एम एके उर्दू शाळांच्या चमूमध्ये झालेल्या रस्सीखेच स्पर्धेने या क्रीडा स्पर्धेने सुरवात झाली.
पथसंचालन नंतर क्रीडा स्पर्धेची मशाल आयुक्तांकडे सोपविण्यात आली. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य दाखविलेल्या विद्यार्थ्यांनी ही मशाल आयुक्तांना सुपूर्द केली. ही मशाल तलवारबाजीमध्ये राज्य स्तरिय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारा नेताजी माध्यमिक शाळेचा मोहब्बत अली, राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत निवड झालेली संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेची डॉली चौधरी, कराटे स्पर्धेत राज्य स्पर्धेत खेळलेली डॉ. आंबेडकर ज्युनिअर कॉलेजची श्रेया करवाडे, राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धेत खेळलेला दुर्गानगर शाळेचा हर्षल वाडेकर व विशू, खेळात विभागीय स्पर्धेत महानगरपालिका शाळेचे प्रतिनिधीत्व केलेली मौलाना अबुल कलाम आझाद शाळेची शहनाझ बानो यांनी संयुक्तपणे आणली.

महानगरपालिकेच्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी रोमहर्षक कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दुर्गानगर माध्यमिक शाळेच्या मुलींनी नन्हा मुन्ना राही हूं, देश का सिपाही हूं या लोकप्रिय गीतावर डंबेल्स कवायत सादर केली. कपिल नगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थींनींनी रिंग कवायत, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक शाळेच्या मुलींनी मार्शल आर्टचे रोमहर्षक प्रात्यक्षिके दाखवली तर दुर्गानगर शाळेच्या मुलींनी नववारी नेसून तलवारबाजीचे कवायत केली तसेच संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रुमाल ड्रिल करून दाखविले.
क्रीडा संस्कृती जोपासणे आवश्यक – डॉ. चौधरी
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अभ्यासासोबत क्रीडा नैपुण्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याची आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षणोत्सव हा मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एक मंच असून यात विद्यार्थ्यांना आपल्या नैपुण्य दाखविण्याची पूर्ण संधी मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य व मैदाने उपलब्ध करून दिले जात आहे. गणराज्य दिनाच्या संचालनामध्ये महापालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना कौशल्य व प्रतिभा दाखविण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी केले. ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी अनिता भोतमांगे, निहाल पोरेड्डीवार, वैभव कुमरे, मिताली पाटील, समीर येवले, मंगेश पवनीकर, शुभांगी कडूकर, मंजीत मंडल, आकाश केचे, प्रणाली गुजर व पूजा भारती या क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन मधु पराड यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी संजय दिघोरे यांनी मानले.








