वर्धा :- चिंचोली शेतशिवारातील नाल्यावर लावलेले डिझेल इंजिन चोरून नेणाऱ्या टोळीचा सेलू पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून चोरीचे इंजिन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दामोधर अंकुश करनाके (२२, रा. कोलगाव), शिवम घनशाम अवघडे (२२) आणि विवेक विनोद वाढवे (२०, दोघेही रा. वडगाव कला, ता. सेलू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सेलू येथील रहिवासी हरीनारायण शंकर कामडी यांची चिंचोली शिवारात शेती आहे. त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यावर पिकांच्या सिंचनासाठी ‘इंदिरा मार्शल’ कंपनीचे डिझेल इंजिन लावले होते. २५ ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी हे इंजिन चोरून नेले. याप्रकरणी कामडी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच डी.बी. पथकाचे पोलिस हवालदार गजानन कमठाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, तीन संशयित तरुण दुचाकीवरून डिझेल इंजिन घेऊन सेलूकडे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून दामोधर करनाके, शिवम अवघडे आणि विवेक वाढवे या तिघांना ताब्यात घेतले.
विक्रीसाठी नेतानाच आवळल्या मुसक्या
पोलिसांनी तिघांचीही कसून चौकशी केली असता, त्यांनी चिंचोली शेतशिवारातून डिझेल इंजिन चोरल्याची कबुली दिली. हे चोरीचे इंजिन विकण्यासाठीच ते सेलू येथे घेऊन जात असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २० हजार रुपये किमतीचे चोरीचे डिझेल इंजिन आणि गुन्ह्यात वापरलेली ७० हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच ३२ एक्यू ७२२८, असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सेलूचे ठाणेदार तथा सहायक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलिस उपनिरीक्षक उमेश उगले आणि डी.बी. पथकातील पोलिस अंमलदार अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, गजानन कमठाने, विनायक गोडे व लोकेश पवनकर यांनी केली.








