– फूल गळती होऊन नुकसान होण्याची शक्यता
अकोला :- तापमानातील चढ-उतारासह हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे तूर पिकावर संकट आले आहे. फूल गळती होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता दिसून येते. शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागाने दिला आहे.
कडधान्य पिकामध्ये तूर हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. देशामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात व झारखंड राज्यात तूर उत्पादन होते. महाराष्ट्र उत्पादनात पहिला व क्षेत्रानुसार दुसऱ्या क्रमांकवर आहे. देशामध्ये तूर पिकाखाली ४९.०० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ४२.२२. लाख टन उत्पादन झाले. देशाची उत्पादकता ८६१ किलो प्रति हेक्टर आहे. सन २०२३-२४ साली राज्यात तूर या पिकाखाली १२.७५ लाख हेक्टर क्षेत्र होते, ८.९६ लाख टन उत्पादन झाले. राज्याची उत्पादकता ७२२ किलो प्रति हेक्टर आहे. विदर्भात सुमारे सहा लाख हेक्टर क्षेत्र तूर लागवड होते, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.
तूर लागवडीसाठी जमीन मध्यम ते भारी ३० ते ४५ सें.मी. खोल व पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. या पिकास २१ ते २४ अं.से. तापमान पोषक मानले जाते. पाण्याची कमतरता असेल तर भारी जमिनीत हे पीक ३० ते ३५ अं.से. तापमानात सुद्धा चांगले येते. फुले व शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे हवामान पिकास अवश्यक आहे. सद्यस्थितीत पीक फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पिकाची क्रिया मंदावून फुलगळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी थंडीमुळे आकसून पेशींना हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दाणे आकसणे तसेच तडकण्याची शक्यता असते. खरीप हंगामातील तुरीचे पीक कोरडवाहू पट्ट्यात फुलोरा आणि शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानातील चढ-उतार होत असून फुल गळ होण्याची दाट शक्यता दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेत, पोषण आणि पाणी व्यवस्थापनाचा सल्ला
फुलगळ होण्यामागे तापमानातील चढ-उतार, थंडीची लाट, अति पाऊस किंवा दुष्काळ, पोषणद्रव्यांची कमतरता, कीड–रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याचा ताण जास्त वारा किंवा ओलावा आदी कारणे आहेत. फुलगळ नियंत्रणासाठी शेत व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करण्याचा सल्ला कडधान्य संशोधन विभागाचे डॉ. प्रदीप ठाकरे व डॉ. विजय गावंडे यांनी दिला आहे.




