– मंदिराच्या परंपरेला न्याय देणाऱ्या न्यायमूर्तींवर महाभियोग हा हिंदूंविरोधातील कट
मुंबई :- न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी 1 डिसेंबर रोजी मदुराई येथील मंदिरात ‘तिरुपरनकुंद्रम दीपम’ प्रज्वलित करण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले. अशा न्यामूर्तींविरोधात महाभियोग आणण्यासाठी संसदेत उबाठा गटाच्या खासदाराने स्वाक्षरी केली आहे. मंदिराच्या परंपरेला न्याय देणाऱ्या न्यायमूर्तींवर महाभियोग म्हणजे विरोधकांचा हिंदूविरोधी कट असून त्याला उबाठा गटाची सक्रिय साथ आहे. हिंदूंचा, देवदेवतांचा आणि त्यांना मते देणा-या मतदारांचा अपमान उबाठा गट करत आहे असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या खासदाराची ही भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का, अशा खासदारावर काय कारवाई करणार अशी प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली नाही तर त्यांचे हिंदूंवरचे प्रेम हे बेगडी असल्याचे सिद्ध होईल असाही घणाघात बन यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करायला हवी असे आव्हान बन यांनी दिले.
उबाठा खासदाराने घेतलेली हि हिंदूविरोधी भूमिका मुंबईकरांना आणि मतदारांना मान्य आहे का असा सवाल करून बन म्हणाले की, जुन्या जाणत्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनाही ही उबाठा गट आणि खासदाराची भूमिका आवडणार नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंच्या, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हयात घालवली. हिंदुत्वाची ज्योत जागवणा-या बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवत उबाठा गट हिंदुत्वविरोधी भूमिका घेणा-यांसोबत मांडीला मांडी लावून बसला आहे. वंदनीय बाळासाहेब आज हयात असते तर देव, देश व धर्म विरोधी भूमिका घेण्या-या त्यांच्या पक्षाच्या खासदाराची पक्षातून हकालपट्टी केली असती. हिंदुत्वाची ज्योत विझवण्याचा उघडउघड प्रयत्न उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उबाठा गट करत आहे. हिंदुत्वाची ज्योत विझवणा-यांची मशाल आगामी निवणुकांमध्ये सूज्ञ मतदारच विझवतील असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.
संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपदाचा हट्ट म्हणजे घटनात्मक अज्ञान असल्याची टीका बन यांनी केली. काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्यात एकमत अजिबात नाही, त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. मविआ घटक पक्षांचे आधी एकमत होऊदे मग सभापती निर्णय घेतील असा टोलाही बन यांनी लगावला.
महायुती सरकारचा पारदर्शक कारभार : दोषींना कठोर शासन
भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत पलटवार करत बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसून दोषींवर थेट कारवाई केली जाते. शंभर कोटींची वसुली करणा-या आणि भ्रष्टाचारात अखंड बुडालेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना महायुती सरकारवर बिनबुडाचे आरोप करण्याचा अधिकार नाही. कोविड काळातील खिचडीपासून कंत्राटांपर्यंतचा भ्रष्टाचार महाराष्ट्र विसरलेला नाही याचाही उल्लेख त्यांनी केला.




