spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘वंदे मातरम्’ उद्यान नव्या पिढीसाठी प्रेरणा स्थळ – मुख्यमंत्री

-‘वंदे मातरम्’ उद्यानाचे थाटात लोकार्पण

– भांडेवाडीतील मासळी बाजाराचे ई-भूमिपूजन

-‘वंदे मातरम्’च्या स्वरांनी दुमदुमूले परिसर

नागपूर :- देशाच्या रक्षणासाठी शौर्य दाखविलेल्या परमवीर चक्र विजेत्या शूरवीरांना समर्पित बजेरिया भागातील एम्प्रेस मॉलच्या समोर मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या वंदे मातरम् उद्यानाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी(ता.१३) लोकार्पण करण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना व राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विकास विभाग आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या मासळी बाजाराचे ई-भूमिपूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.रामस्वामी एन.,मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी., मुख्य अभियंता मनोज तालेवार, माजी आमदार विकास कुंभारे, माजी महापौर प्रा.अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी नगरसेवक दीपराज पार्डीकर, माजी नगरसेवक राजेश बागडी, ब्रिजभूषण शुक्ला, निवृत्त सैनिक राम कोरके,मनपाचे उपायुक्त गणेश राठोड, उद्यान संवर्धक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे यांच्यासह अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

शौर्य अन् क्रांतीच्या मंत्रासह ‘विकास व विरासत’ चे प्रतीक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘विकास आणि विरासत’ या दोन्ही गोष्टींची सांगड या कार्यक्रमात बघायला मिळत आहे. वंदेमातरम् उद्यान हा आमचा वारसा आहे तर लवकरच निर्माण होणारे मासळी मार्केट हे आमच्या विकासाचे प्रतीक आहे. ‘वंदे मातरम् उद्यान हे नागपूर शहराला मिळालेली एक सुंदर भेट आहे. ‘ज्यावेळी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले, त्यानंतर ते स्वातंत्र्याच्या लढाईत उतरणाऱ्या सर्वांसाठी महामंत्र बनले. बंगालच्या फाळणीविरोधातील लढाईचे मूळ मंत्र ‘वंदे मातरम्’ हे गीत आणि घोष बनला होता. फाशीवर जातानाही क्रांतिकारक आपली मातृभूमीला नमन करत ‘वंदे मातरम्’ म्हणत फासावर जात असत. आज वंदे मातरम् ला १५० वर्षे पूर्ण होत असताना, नागपूर शहरात एक सुंदर ‘वंदे मातरम् उद्यानाचे लोकार्पण होत आहे, यासाठी मी महानगरपालिकेचे खूप खूप आभार मानतो, हे उद्यान अनेकांसाठी प्रेरणा उद्यान होईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. या उद्यानात प्रोजेक्शन मॅपिंग करण्यासाठी राज्य सरकार मदत करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय भांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक मासळी मार्केट पूर्ण झाल्यावर त्याचा विक्रेते आणि खरेदीदार या दोघांनाही फायदा होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मासळी मार्केट म्हणजे आरोग्य आणि आधुनिकतेचा संगम : राणे

मंत्री नितेश राणे यांनी सर्वप्रथम मत्स्यव्यवसाय खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. नागपूर शहरात १८ प्रकारच्या नागरी सुविधा तर मिळतातच,पण त्याचबरोबर एक दर्जेदार मासळी मार्केट उभे राहिले पाहिजे, या दृष्टीने आम्ही पाऊल टाकले आहे. यासाठी आमदार प्रवीण दटके यांचा सातत्याने पाठपुरावा होता आणि या भूमिपूजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे राणे यावेळी म्हणाले. तसेच हा प्रकल्प केंद्र सरकार,राज्य सरकार आणि महानगरपालिका मिळून पूर्ण करणार आहेत. राणे यांनी विश्वास व्यक्त केला की, नागपूर शहरात येणाऱ्या काळात असे मासळी मार्केट उभे राहील,ज्याचा मुख्यमंत्री यांना निश्चितपणे अभिमान वाटेल.

राष्ट्ररक्षणासाठी प्राणाची परवा न करता सर्वोच्च बलिदान देत शत्रूविरोधात लढताना पराक्रमाची शर्थ करणाऱ्या २१ परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने १९ हजार ९१० चौरस मीटर जागेमध्ये वंदे मातरम् उद्यान साकारले आहे. उद्यानात सर्व विजेत्यांचे म्युरल उभारण्यात आले असून, त्याठिकाणी कोनशिलेवर त्यांच्या शौर्याची गाथा शब्दबद्ध करण्यात आली आहे. याशिवाय लहान मुलांवर देशभक्तीचे संस्कार व्हावे, या मुख्य उद्देशाने साकारण्यात आलेल्या उद्यानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवलोकन केले. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने वंदे मातरम् उद्यान साकारण्यात आले असून, उद्यान भारताच्या शहीद सैनिकांना विशेषतः १९७१ च्या भारत-पाक युद्धातील शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचे प्रतीक आहे. याबद्दल बोलताना तिवारी यांनी सर्व संपूर्ण उद्यानाची संक्षिप्त माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी व्यक्त केले. यावेळी नागरिकांनी व मासे विक्रेत्यांनी मुख्यमंत्री आणि राणे यांचे स्वागत केले. या उद्यानाचे वास्तुविशारद प्रियदर्शन नागपूरकर यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

..जेव्हा मुख्यंमंत्र्यांनी गायले ‘वंदे मातरम्’

कार्यक्रमाची सांगता होताच सर्व मान्यवर प्रस्थानासाठी निघणार होते, तेव्हा ‘वंदे मातरम्’ गीताची सुरुवात झाली. ‘वंदे मातरम्’चे स्वर कानी पडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्मानार्थ उभे राहिले. मनपा शाळेतील शिक्षकवृंद प्रकाश कालासिया यांच्या चमूच्या सोबतीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या उत्साहत वंदेमातरम् गाण्याला सुरुवात केली. संपूर्ण गीत हे फडणवीस यांच्या पाठ होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

असे असेल मासळी मार्केट

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विकास विभाग आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण २१ कोटी रुपयांच्या खर्चाने भांडेवाडी येथे मासळी बाजार उभारण्यात येणार आहे. याचे देखील भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मासळी बाजारात 60 घाऊक व किरकोळ मासळी विक्री गाळे असणार आहे. दुचाकी आणि चारचाकी पार्किंग योग्य व्यवस्था असणार आहे. तसेच प्रशासकीय कक्ष, कोल्ड स्टोरेज, वीजपुरवठा व पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र पुरुष आणि महिला शौचालये, मलनिस्सारण प्रक्रिया संयंत्र (Sewage Treatment Plant), अपशिष्ट पाणी प्रक्रिया संयंत्र (Effluent Treatment Plant (30 KLD), कचरा व्यवस्थापनासाठी रेंडरिंग संयंत्र (Rendering Plant for Waste Management), पर्जन्य जल संचयन प्रणाली (Rain Water Harvesting), अग्निशामक व सीसीटीव्ही प्रणाली असणार आहे.

वंदे मातरम् उद्यानाची वैशिष्ट्ये :-

– उद्यानाचे प्रवेशद्वार दिल्लीतील इंडिया गेटचे प्रतिकात्मक प्रतिकृती आहे.

– उद्यानात अमर जवान ज्योती लावण्यात आलेली आहे.

– नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्रता लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना समर्पित खुला रंगमंच तयार केलेला आहे.

– यात हिंदुस्तानी लाल सेनेची माहिती देण्यात आली आहे. लालसेनेच्या 133 स्वतंत्रता संग्राम सैनिकांचे नावे तसेच नागपूर जिल्ह्यातील 98 हुतात्म्यांची नावे कोरण्यात आली आहेत.

– कार्यक्रम घेण्यासाठी मोकळे सभागृह तयार करण्यात आले आहे.

– लहान मुलांसाठी मल्टी प्ले सिस्टम खेळणी लावण्यात आली आहेत.

Popular Articles